“ ज्यांनी आमच्या जीवावर १८ खासदार निवडून आणलेत, ते आता… ” ; चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेवर टीका!

“देशाच्या राजकारणात जायचं असेल तर आधी घराच्या बाहेर पडावं लागतं”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील साधला निशाणा.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

“ज्यांनी आमच्या जीवावर १८ खासदार निवडून आणलेत, ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्नं बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षांत एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गना करू नयेत.”, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

तसेच, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान पुन्हा होणे शक्य नाही. कोविड काळात केंद्र शासनाने परिस्थिती सक्षमपणे पेलली आहे. ममता बॅनर्जीही पंतप्रधान होऊ पाहात आहेत, तर शरद पवार यांचे नाव कायमच पंतप्रधान म्हणून समोर येत असते. मात्र आगामी काळातही भारतीय जनता पार्टीच सत्तेत राहील.” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे सुरू केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,अनुप शहा आदी उपस्थित होते.

“संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करायला निघालेत, तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जना करतायेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात.” असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.

चंद्रकांत पाटील यांचा मागील दहा दिवसांत दुसऱ्यांदा साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव केलेल्या ज्ञानदेव रांजणे यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचं कौतुक सुद्धा केलं होतं. नगरपंचायत, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांचे सातारा दौरे वाढले आहेत.

पालिका निवडणुकीत फलटण नगरपालिकेवरही भाजपाचा झेंडा फडकेल. खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सत्तांतर होईल. त्यावेळी नगरसेवक, विरोधी पक्ष नेते असा प्रवास केलेले आमचे अनुप शहा हे नगराध्यक्ष नक्कीच होतील असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil criticized shiv sena msr