यंदाच्या कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशा आमने-सामने झालेल्या लढतीसोबतच जोरदार चर्चा होती ती चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाची! “कोल्हापुरातून निवडणूक हरल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन”, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पाटलांच्या त्याच विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावर खुद्द चंद्रकांच पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

“दादा, हिमालयात जावा…”

कोल्हापुरात प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिमालयाच्या मुद्द्यावरच चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. दोनच दिवसांपूर्वी इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. ‘दादा हिमालयात जावा’ अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला होता.

जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट

दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेल्या मीममध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून आणि डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो मॉर्फ्ड करून त्याच्या पार्श्वभूमीवर हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. सोबत बॉक्समध्ये ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणी केली आहे.

“पोहोचलो रे मी हिमालयात…”, कोल्हापूरमधील निकालांनंतर जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलं चंद्रकांत पाटलांवर खोचक मीम!

आपल्या हिमालयात जाण्यासंदर्भातल्या विधानाची चर्चा सुरू असल्याचं पाहून कोल्हापूर निवडणुकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावर खुलासा केला आहे. “आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग मी लढलो तर काय होईल? मी असं म्हटलं होतं की मी लढलो आणि जिंकलो नाही तर मी हिमालयात जाईन. मी लढलोच नाही ना. नानाच लढले. अक्षरश: फेस आला तुमच्या तोंडाला. इथे तर कमी मतांनी विजय आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला”; मोठ्या विजयानंतर जयश्री जाधवांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांनी २०१९ साली झालेली विधानसभा निवडणूक पुण्याच्या कोथरूडमधून जिंकली होती. पण तेव्हा पाटील कोल्हापुरातून पळून आल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यावेळी कोल्हापूरमधून कधीही निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे, जर तिथून हरलो, तर हिमालयात निघून जाईन, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.