राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहे. सचिन वाझे याला २००४ सालीच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, २०२० मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्या माध्यमातून त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसंच उत्पादकांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितलं असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा- अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशी करा – किरीट सोमय्यांची मागणी

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचं वाझे याने चौकशीत उघड केलं आहे, असंही या पत्रात लिहिलेलं आहे. सचिन वाझेने दिलेल्या कबुलीजबाबात त्याने अजित पवार आणि अनिल परब यांनी आपल्याला वसुली करण्यास सांगितलं अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या दोघांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

सचिन वाझे प्रकरणावरुन भाजपाचा ठाकरे सरकारवर टीकेचा जोर कायम आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. त्यावेळीही भाजपाने मविआ सरकारवर जोरदार टीका केली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या सीबीआय चौकशीची मागणीही एका पत्रकार परिषदेत केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.