चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपूर महाऔषणीक केंद्राच्या समोर असलेल्या दुर्गापूर नेरी येथे अल्पवयीन मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाडके या अल्पवयीन मुलाला वन्य प्राण्याने उचलून नेल्याने खळबळ उडाली आहे. हा मुलगा दुर्गापूर वॉर्ड नंबर १ मध्ये आदिवासी आश्रम शाळेच्या मागील परिसरात राहत होता. याच परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

हा वन्य प्राणी वाघ आहे की बिबट्या याचा अद्याप शोध लागलेला नाही. चंद्रपूर वीज केंद्रात काल बुधवारी रात्री भोजराज मेश्राम या कामगाराला उचलून नेले होते. त्यानंतर गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह मिळाला होता. त्यानंतर चोवीस तासातील ही दुसरी घटना आहे. वन विभाग मुलाचा शोध घेत आहे. हा संपूर्ण परिसर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला लागून आहे.

दरम्यान, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर होत आहे. बुधवारी वाघाने येथील कामगारावर केलेल्या हल्ल्यानंतर केंद्र आणि वनखात्यातील असमन्वय पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्राचा परिसर ११ हजार २३७ हेक्टरचा असून गेल्या पाच-सहा वर्षांपासून येथे वाघाचे वास्तव्य आहे. त्याआधी बिबट या परिसरात मोठय़ा संख्येत होते. २६ ऑगस्ट २०२० ला केंद्रातील निवासस्थान परिसरात आई आणि तिची पाच वर्षांची मुलगी फिरत असताना मुलीला बिबटय़ाने उचलून नेले. त्यानंतर दोन डिसेंबर २०२१ ला वाघाने एका व्यक्तीला जखमी केले.