Chandrhar Patil महाविकास आघाडीत ज्यांच्यामुळे धुसफूस झाली, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद होतात की काय असे चंद्रहार पाटील यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा दिला. त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. चंद्रहार पाटील हे उद्धव सेनेला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास निश्चित मानलं गेलं होतं. दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहूनही चंद्रहार पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काय म्हणाले चंद्रहार पाटील?

“माझा कुठल्याही पक्षाबाबत किंवा नेत्याबाबत काहीही आक्षेप नाही. माझा आक्षेप आहे तो महाविकास आघाडीबाबत आहे. लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्या उमेदवारीबाबत सगळ्यांनी काय झालं ते पाहिलं. पण शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी महाविकास आघाडीही माझ्यासमोर शत्रू म्हणून उभी राहिली. महायुतीही शत्रू म्हणून उभी राहिली. मी ती निवडणूक एकटा लढलो, मागे हटलो नाही. त्यावेळी ६० हजार मतं मला मिळाली. ही संख्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जास्त मोठी नाही. कारण चार लाख वगैरे मतं घेऊन निवडून येत असतो. पण आज शेतकऱ्यांचा मुलगा दिग्गजांसमोर उभा होता. पण सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली आहे. माझ्यासाठी ६० हजार मतं खूप मोठी आहेत. मला ताकद द्या, ६० हजार मतांची ताकद मी सहा लाख मतांमध्ये करु शकतो असा विश्वास आहे.”

चंद्रहार पाटील काय ब्रँड आहे ते महाराष्ट्राला माहीत आहे-चंद्रहार पाटील

कुस्ती आणि क्रीडा क्षेत्रातले प्रश्न मी आपल्यासमोर आले. अनेकांनी मला विचारलं की या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय? पण आज मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत आलो आहे. कारण त्यावेळीही मी कुस्तीसाठी, क्रीडा क्षेत्रासाठी जे काही प्रश्न उपस्थित केले, उपोषण केलं त्यासाठी कुठलाही पाठिंबा मला महाविकास आघाडीने दिला नाही. आज एकनाथ शिंदे यांनी क्रीडा क्षेत्रासाठी शब्द दिला आहे. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. चंद्रहार पाटील काय ब्रँड आहे याची कल्पना महाराष्ट्राला आहे. मला पद नको, पण भविष्यात काम करण्याची संधी दिली तर ती प्रामाणिकपणे निभावेन. लाल मातीने आम्हाला प्रामाणिकपणा शिकवला. येणाऱ्या काळात शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न मी करेन. असंही आज आपल्याला आश्वस्त करतो असं चंद्रहार पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.