सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील गोंधळ मविआची संयुक्त घोषणा होऊनही काही मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारीला खो कोणी घातला याचीच चर्चा जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणीही राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना सतावते आहे. उमेदवारी बदलाच्या खेळात मी सहभागी नव्हतो, हे त्यांना प्रत्येक ठिकाणी का सांगावे लागत आहे, हेच सामान्य मतदारांना कळेना झाले आहे अशातला भाग नाही. मात्र, गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत त्यांना आघाडी धर्माचे पालन करण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला. स्टेजवर एक आणि खाली एक जर असे वागणार असाल तर अखेरचा नमस्कार. असे सांगितले. मात्र, हा निर्वाणीचा इशारा आघाडीतील मित्रांना की, शत्रूच्या राहुटीतील मित्रांना?

हेही वाचा >>> बेरोजगारीकडे गांभीर्याने न पाहिल्यास आगामी दशक हिंसक होईल, वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांचा इशारा

प्रचार नको; पण समित्या आवर!

पुणे शहरातील काँग्रेस ही एकाच घरात राहून सतत भांडणारी; पण घराबाहेरची व्यक्ती आली की, एकमेकांच्या गळयात पडून, कायम बेगडी प्रेम दाखवत आली आहे. भांडणासाठी फार मोठे कारण लागते, असेही नाही. क्षुल्लक कारणही पुरसे असते. प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेसमधील धुसफूस कायम बाहेर येत असल्याने मतदानाचा दिवस जवळ येत चालला तरी कुरघोडया करणे चालूच आहे. आता त्याला निमित्त घडले आहे, प्रचाराच्या वेगवेगळया समित्या. प्रचारापेक्षा प्रचारासाठी नेमलेल्या समित्यांचाच प्रचार सर्वदूर पोहोचला आहे. पुण्यातील एक ज्येष्ठ नेता आपल्यावरच प्रचाराची धुरा असल्याचे सतत दाखवत असल्याची तक्रार काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी दबक्या आवाजात करत असतात. पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचीही सूत्रे सवयीप्रमाणे प्रारंभी संबंधित नेत्याकडेच आली. त्यामुळे इतर पदाधिकारीही नेहमीप्रमाणे अस्वस्थ झाले. यावेळी मात्र त्यांनी वेगळी शक्कल लढविली. नाराज मंडळींनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना गाठले. त्यामुळे प्रचारासाठी वेगवेगळया समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार जाहीर सभा, कोपरा सभा, पदयात्रा, महिला मेळावे, प्रचार साहित्य वाटप, पत्रकार परिषदेचे आयोजन करणे आदी समित्या स्थापन करून त्यावर काही जुन्या काँग्रेस निष्ठावंतांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे कामाचे विकेंद्रीकरण झाले. प्रचारासाठी ही बाब चांगली असली, तरी या समित्याच आता अंतर्गत वादाला कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळे निर्णय कोणी जाहीर करायचा? याची चढाओढ लागलेली असते. समित्यांचाच प्रचार जास्त होत असल्याने प्रचार नको पण समित्या आवर, अशी म्हणण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(संकलन : सुजित तांबडे, दिगंबर शिंदे)