विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येत आहे. परिणामी त्यांचे विरोधी पक्षनेतेपदही आपसूकच जाणार. दानवे हे संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतात. महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकाच झालेल्या नसल्याने विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या जागा रिक्त. संभाजीनगरची निवडणूक लगेचच होण्याची शक्यता नाही. यामुळेच अंबादास दानवे यांचे भवितव्य काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. दानवे यांच्या मनात काही वेगळा विचार असावा, तसे सध्या तरी काही दिसत नाही.
‘अंदाज’ आपले आपले…
देशभरातील अंदाज समितीच्या अध्यक्षांची दोन दिवसांची परिषद सोमवारपासून विधान भवनात सुरू झाली. या परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी मिळाल्याने महाराष्ट्र विधिमंडळाचा खरे तर गौरवच. पण समितीची राष्ट्रीय परिषद होत असताना संशयाचे मळभ निर्माण झालेले आणि त्याचे पडसाद परिषदेत उमटणे हे स्वाभाविक. राज्य विधिमंडळातील अंदाज समिती गेल्याच महिन्यात धुळे जिल्हा दौऱ्यावर गेली होती. या वेळी शासकीय विश्रामगृहात समिती प्रमुखांच्या सचिवांच्या कक्षात १ कोटी ८४ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. एवढी रोख रक्कम आमदारांच्या दौऱ्यातच नेमकी विश्रामगृहात कशी आली, हे सारेच गूढ. त्याची चौकशी करण्यात आली पण चौकशीचे निष्कर्ष उघड होणे कठीणच. यामुळेच ही रोख रक्कम कशी आणि कोणासाठी आणण्यात आली होती, याचा अंदाज जो तो आपापल्या परीने लावत आहे. त्यातच समितीचा कारभार पारदर्शक असावा, अशा कानपिचक्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देणे ही खरे अंदाज समितीच्या सदस्यांसाठी नामुष्कीच.
उदयनराजेंची भेटभाजपचे केंद्रातील
व राज्यातील मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी साताऱ्याला आल्यावर आणि शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी नवीन पदावर रुजू झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘जलमंदिर’ या निवासस्थानी भेटीसाठी हजेरी लावतात. नुकतेच एक वरिष्ठ अधिकारी साताऱ्यात रुजू झाले. ते उदयनराजेंना भेटण्यासाठी गेले. त्यांनाही उदयनराजेंनी छोटी भेट दिली. या वेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उदयनराजेंनी त्यांना गाडीपर्यंत सोडून आदर व्यक्त केला. तेवढ्यात कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. महाराजांनी साहेबांना काय भेट दिली. या वेळी उपस्थित असणारे अनेक कार्यकर्ते म्हणाले अरे ही सुगंधी भेट (गिफ्ट) आहे. पण सरकारी अधिकाऱ्याने खासदारांच्या निवासस्थानी भेट देणे योग्य आहे का, याचीच चर्चा सध्या अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू आहे.