नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रातले आणि राज्यातले अनेक मोठमोठे नेते उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ हे मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे यांनी मला ओबीसी चळवळीत मोठा भाऊ मानलं होतं. ओबीसी चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तसेच राज्यात भाजपाला मोठं करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यासाठी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना विसरता येणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात सर्वात आधी माधवंचा प्रयोग (माळी, धनगर आणि वंजारी) केला.”

छगन भुजबळ म्हणाले की, “ओबीसींना एकत्र करायचं, राज्यातल्या ५४ टक्के लोकांना एकत्र करायचं काम सोपं नव्हतं. यात ३०० ते ४०० जाती आहेत. त्यांचे प्रश्न गोपीनाथ मुंडे यांनी सोडवले. ओबीसींची जातीय जनगनणा झाली पाहिजे अशी मागणी समीर भुजबळ आणि गोपीनाथरावांनी लोकसभेत लावून धरली.”

हे ही वाचा >> “आम्ही १३० ते १४० जागा लढवणार, इतरांच्या शब्दाला काही अर्थ नाही” बावनकुळेंच्या वक्तव्यावर संजय गायकवाड आक्रमक

“…तर माझी अडीच वर्ष तुरुंगात गेली नसती”

भुजबळ म्हणाले की, “मधल्या काळात अनेक अडचणी आल्या. गोपीनाथराव असते तरे माझी अडीच वर्ष जेलमध्ये नक्कीच गेली नसती.” हे बोलत असताना भुजबळ गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाले होते. भुजबळ म्हणाले की, “पहाडासारखा माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा राहिला असता. परंतु दुर्दैवाच्या सीमा कधी कळत नाहीत. पण महाराष्ट्राचा हा पठ्ठा आज हवा होता. ते आज असते तर त्यांनी ओबीसींची जातीय जनगनणा करून घेतली असती.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal gets emotional by memory of gopinath munde asc
First published on: 18-03-2023 at 19:34 IST