शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडत काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जात महाविकासआघाडी सरकार स्थापन केलं. यावरून भाजपाकडून वारंवार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दाखल देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, असाही आरोप भाजपाचे नेते करतात. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षाने हिंदुत्व सोडलं, अशीही टीका होते. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१३ ऑक्टोबर) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला. यावेळी भुजबळ बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “अंतुलेंच्या वेळी शिवसेनेने काँग्रेसला पूर्ण पाठिंबा दिला, बाळासाहेबांनी एकही उमेदवार उभा केला नाही. त्या बदल्यात शिवसेनेला तीन विधान परिषदेच्या जागा (एमएलसी) मिळाल्या. तेव्हा मनोहर जोशी, नवलकर, वामनराव महाडिक विधान परिषदेत आमदार झाले. बाळासाहेब काँग्रेसबरोबर केले नाही असं नाही. तेही काँग्रेसबरोबर गेले होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला पाठिंबा दिला होता.”

“बाळासाहेबांनी मुस्लीम लीगच्या अध्यक्षांबरोबर दोन सभा घेतल्या”

“भाजपावाले आज म्हणतात काँग्रेसबरोबर गेले, हिंदुत्व सोडलं. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लीम लीगचे अध्यक्ष बॅरिस्टर गुलाम मोहम्मद महमूद बनातवाला यांच्याबरोबर मस्तान टँकवर आणि त्यानंतर झुला मैदानावर दोनदा सभा घेतल्या. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की तुम्ही भारतीय मुसलमान आहात, आपण एकत्र काम करू. बाळासाहेब ठाकरेंचा तोच दृष्टिकोन होता,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

“बाळासाहेब सलमान रश्दींविरोधातील मोर्चात बनातवालांबरोबर सहभागी”

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “इतकंच नाही, तर सलमान रश्दीविरोधात मुस्लिमांचा मोर्चा निघाला. त्यावेळी बनातवालांबरोबर बाळासाहेब ठाकरे भेंडी बाजारातून त्या मोर्चात गेले. हे काय सांगतात हिंदुत्व. मन मोठं असावं लागतं, तेव्हा लोक मोठे होतात. काही काळ प्रॅक्टिकल सोशालीझमची नवा काळ आणि खाडिलकरांचीही कास बाळासाहेबांनी धरली.”

हेही वाचा : लोक विचारतात तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली? शरद पवारांसमोर छगन भुजबळांनी दिलं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राजकारणात पुढे जायचं असेल तर तडजोडी कराव्या लागतात”

“पुढे माझ्याच घरी बाळासाहेब आणि दलित सुरक्षा महासंघाच्या प्रमुखांची बैठक झाली. पुढच्या महानगरपालिका निवडणुकीत दलित महासंघाने सगळीकडे उमेदवार उभे केले आणि आम्हीही सगळीकडे उमेदवार उभे केले. दलित महासंघाने काँग्रेसची मतं खाल्ली आणि शिवसेनेचे आमचे उमेदवार निवडून आले. राजकारणात पुढे जायचं असेल तर काहीवेळा तडजोडी कराव्या लागतात, सांभाळावं लागतं,” असंही छगन भुजबळ यांनी नमूद केलं.