छत्रपती संभाजीनगर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेत बनावट हजेरीपटाचे दस्तावेज व देयके जोडून २० ते २५ लाख रुपयांचा संगनमताने केलेला गैरव्यवहार पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, गृहपालासह सहा जणांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी चौकशी केली व संबंधित तत्कालीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, गृहपालासह इतरांवर कारवाई करण्याविषयी नाशिकच्या कार्यालयास पत्र लिहिले होते. परंतु, त्यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने अखेर सरकारतर्फे पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र केशवराव शिंदे यांनी तक्रारी नोंदवली. त्यावरून तत्कालीन सहायक प्रकल्प अधिकारी दिलीप नारायण खोकले, गृहपाल उत्तम नागोजी राऊत, सुरेंद्र अंबादास कावरे, श्याम बबनराव देशमुख, बळीराम भीवाजी गडमे यांच्यासह इतरांवर फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आदी कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी चौकशीसाठी याचिकाकर्ता शेख हुसैन दादाभाई आणि प्रशांत बोडखे यांनी खंडपीठात तक्रार अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने १ एप्रिल २०२४ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी भेाजन पुरवठा देयकाचे बनावट हजेरीपट दस्तावेज तयार करून शासनाची २० ते २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. आदेशावरून चौकशी झाली. २०१६ ते २०२० या कालावधीत बनावट हजेरीपत्रक, खोटे प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांचा वापर करून भोजन देयके तयार करण्यात आली होती. प्रत्यक्षात भोजन न पुरवता निधी उचलण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.