छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातून नाशिक प्रदेश घटस्थापनेपासून (२२ सप्टेंबर) स्वतंत्र झाला आहे. यासंदर्भातील अधिसूचना २५ ऑगस्ट रोजी निघाली होती. राज्यात आता पूर्वीसारखेच सहा प्रादेशिक कार्यालये अस्तित्वात आले आहेत.

नाशिक प्रदेशांतर्गत नाशिकसह धुळे-जळगाव व अहिल्यानगर या चार जिल्ह्यांचे कामकाज चालणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर प्रदेशात आता सात जिल्हे राहणार आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड परभणी हे सात जिल्हे राहणार आहेत. परभणी विभागामध्येच हिंगोली जिल्हा समाविष्ट असल्याने छत्रपती संभाजीनगर प्रदेशात सात विभाग येतात, अशी माहिती सिडको येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली.

यापूर्वी सिडको बसस्थानकानजीकच्या प्रशासकीय कार्यालयांर्तगतच नाशिक प्रदेशही जोडलेला होता. यासंदर्भाने केंद्रीय पथकाने तीन नियंत्रण समित्या नियुक्त केल्या होत्या. त्यातून कामकाजाची चाचणी केली. त्यातून नाशिक प्रदेश स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भाने २५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाला पत्र पाठवून सूचना देण्यात आली. त्यानंतर २२ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. त्यानुसार प्रादेशिक व्यवस्थापक, सांख्यिकी अधिकारी व प्रादेशिक अभियंता या पदांच्या माध्यमातून कामकाज सुरू झाले आहे.