परभणी : महिला सक्षमीकरणासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी दिली आहे. या उपक्रमाकरिता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा उपनिबंधकांना महिलांची सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता परभणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सूक्ष्म आराखडा तयार करून तालुकास्तरावर सहायक निबंधकांना लाडकी बहिणीची सहकारी पतसंस्था स्थापन करण्याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत.
पतसंस्थेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना छोटा-मोठा उद्योग सुरू करता यावा या दृष्टिकोनातून नावीन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गावोगावी पतसंस्था चळवळ उभी राहावी, हा सहकार विभागाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हास्तरावर संस्थानोंदणीसाठी १ हजार ५०० सभासद गरजेचे असून, १० लाख भागभांडवल आवश्यक आहे. याशिवाय नगरपालिका, तालुका क्षेत्रासाठी ५०० सभासद व पाच लाख रुपये भागभांडवल, गावासाठी २५० सभासद व दीड लाख भागभांडवल आवश्यक आहे. नोंदणीनंतर संस्था योग्य प्रकारे चालविण्यासाठी प्रत्येक पतसंस्थेसाठी सहकार विभागातील सहायक निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची ‘पालक अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. हे अधिकारी हिशेबलेखन, संस्था व्यवस्थापन, लेखापरीक्षण याबाबतही मार्गदर्शन करतील, असे प्रसिद्धिपत्रकाद्वारे भालेराव यांनी कळविले आहे.