सांगली : जिल्ह्यात ढगाळ हवामान सलग कायम असून शुक्रवारी सायंकाळी शिराळा तालुक्यात, तर शनिवारी पहाटे आष्टा, इस्लामपूर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसासोबतच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. तसेच ऊसतोडीसाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मिरज तालुक्यात पहाटे तुरळक पावसाची हजेरी होती. मिरज तालुक्यात गुरुवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर काल सायंकाळी शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड तास पाऊस पडत होता. या पावसाने रब्बी पिकांना पोषक स्थिती निर्माण झाली असली, तरी ऊसतोडीची कामे थांबली आहेत. रानात ऊसतोडीसाठी अडचण निर्माण झाली असून, तोडलेला ऊस चिखलामुळे रानातून बाहेर काढणे मुश्कील झाले आहे.

हेही वाचा…राजारामबापू’च्या ऊसदरास शेतकरी संघटनांचा विरोध, ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा

पावसामुळे सखल भागातील ऊसतोडी शनिवारी थांबविण्यात आल्या. मध्यरात्री आष्टा, इस्लामपूर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पेठ-इस्लामपूर मार्गाचे काम सध्या सुरू असून, पावसाने काम आज धीम्या गतीने सुरू होते, तर काही ठिकाणी चिखल झाल्याने काम बंद करावे लागले. वाहनधारकांना दुपारपर्यंत या मार्गाने प्रवास करताना वाहन घसरणार नाही, याची दक्षता घ्यावी लागत होती. दरम्यान, मिरज तालुक्यात पहाटे आणि सकाळी नऊ वाजता पावसाचा शिडकावा झाला.

हेही वाचा…अवकाळीचा फटका, कोल्हापुरात उस जमीनदोस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान, तर कधी हलका पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली असून, सतत बदलत असलेल्या हवामानामुळे रोगाला अटकाव करण्यासाठी कोणते जालीम उपाय योजावेत याचीच चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. तर, रब्बी हंगामातील शाळू पीक अवकाळी पावसाने तजेलदार बनले आहे. हवामानातील बदल शाळू पिकासाठी संजीवनी ठरला आहे.