बीड : बीड आजपासून रेल्वेच्या नकाशावर अधिकृतपणे येत असून, हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने बीड ते अहिल्यानगर या १६० किलोमीटर अंतरात पहिली रेल्वे धावणार आहे. या रेल्वेला हिरवा झेंडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी साडेदहा वाजता दाखवणार असून, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारीच येथे पोहोचले आहेत.

बीडमधील तीन पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून साकार होत असून, बीडकरांसाठी असलेल्या या ऐतिहासिक क्षणाची चौथी पिढी साक्षीदार ठरणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बीडकरांमध्ये प्रचंड उत्साह असून, पहिल्या रेल्वेतून प्रवास करण्यासही उत्सुक आहेत. अनेक संघटना, मंडळांचे नागरिक या रेल्वेने प्रवास करण्यासाठी सज्ज झाले असून, त्यासाठी मागील काही दिवसांपासून त्यांनी आरक्षित जागा निश्चित केली आहे.

परळी-बीड-अहिल्यानगर, असा २६१ किलोमीटर अंतराचा पूर्ण रेल्वे मार्ग असून, पहिला टप्पा बीड ते अहिल्यानगर असा सुरू होत आहे. या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी सोमवारीच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी १५० कोटींचा निधी वितरित केला आहे. एकूण ४ हजार ८०५ कोटी रुपये खर्चाच्या या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने ५०-५० टक्के वाटा उचलून निधी दिलेला आहे. त्यात राज्य शासनाने ५० टक्के वाटा उचलत आतापर्यंत एकूण २ हजार ९१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या रेल्वे मार्गामुळे बीडकरांचे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होत असून, परळीपर्यंतच्या मार्गाचेही काम प्रगतीपथावर आहे.

पुढील वर्षात परळीपर्यंतचे काम पूर्ण करून संपूर्ण २६१ किलोमीटर अंतरावरील परळी-बीड-अहिल्यानगर अशी रेल्वे धावेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.