पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘घराणेशाही’वरून केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली आहे. “घरांदाज असलेल्यांनी घराणेशाहीवर बोलावं. घरंदाज नसलेल्यांनी घराणेशाहीवर बोलू नये. घराण्याची परंपरा काय असते, हे मोदींना माहिती नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “घरंदाज म्हणजे काय? तुम्ही निवडणूक एकाबरोबर लढली, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं. अर्थात लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर केला आणि हनिमून तिसऱ्याबरोबर केलं. हे म्हणजे घरंदाज आहे का? बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली. त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. बाळासाहेब असते तर जोड्यानं मारलं असतं.”
“तुमची परिस्थिती ‘घरका ना घाटका’ झाली”
“इतरांना तुच्छ आणि ऐरे गैरे समजण्याचं काम तुम्ही केलं. बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण, हे सहकाऱ्यांना घरगडी समजतात. म्हणून तुमची परिस्थिती ‘घरका ना घाटका’ झाली आहे. याला जबाबदार तुम्ही आहात. आता सगळीकडे फिरत आहेत. आधी फिरले असते, तर ही वेळ आली नसती. शिवसेना मोठी करण्यात तुमचं योगदान काय? आमच्यासारख्यांनी घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेना वाढवली,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत घराणेशाहीवर बोलले आहेत. पंतप्रधानांनी घराण्यावर बोलू नये. तुम्ही आमच्या घराण्यावर बोलाल, तर आम्हीही तुमच्या घराण्यावर बोलू. घरांदाज असलेल्यांनी घराणेशाहीवर बोलावं. घरंदाज नसलेल्यांनी घराणेशाहीवर बोलू नये. घराण्याची परंपरा काय असते, हे मोदींना माहिती नाही. त्यामुळे आजपर्यंत मदत करत आलेली ठाकरेंची घराणेशाही मोदींना नकोशी झाली आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी शनिवारी ( १३ जानेवारी ) केली होती.
पंतप्रधानांनी काय म्हटलं होतं?
“घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं अरपिमित नुकसान झालं आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचा प्रभाव कमी करण्यासाठी देशातील युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं,” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( १२ जानेवारी ) केलं होतं.