मुंबई : राज्यात या वर्षी उसाचे उत्पादन अधिक झाले असून मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शिल्लक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवावे, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्याचबरोबर राज्यात १ मेनंतरच्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

‘सह्याद्री’ अतिथिगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी उपस्थित होते. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक असल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांच्या हितासाठी १ मेनंतर गाळप झालेल्या सर्व उसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार आहे. राज्यात १ मे २०२२ नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे ५२ लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी ३२ लाख टन ऊस गाळप झाला आहे. तसेच १ मे २०२२ नंतर गाळप होणाऱ्या व ५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या साखर आयुक्तांनी अनिवार्य ऊस आदेश काढलेल्या उसाला प्रतिटन पाच रुपये प्रति किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येईल, असेही सहकारमंत्री पत्रकार परिषदेत माहिती दिली. गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये राज्यात एकूण १३.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. सन २०२०-२१ मध्ये ११.४२ लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. तसेच १६ मे २०२२ अखेर १०० सहकारी व ९९ खासगी असे १९९ साखर कारखान्यांकडून १३००.६२ लाख टन ऊस गाळप झालेले आहे. मागील वर्षी याच काळात १०१३.३१ लाख टन गाळप झाले होते. चालू वर्षी २८७.३१ लाख टन गाळप जास्त झालेले आहे.