लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या संदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. तसेच जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. मात्र, असं असलं तरी सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं चित्र आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीपासूनच धुसफूस पाहायला मिळत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला, तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. यानंतर विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाष्य करत अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या मतदारसंघामधून काँग्रेसही उमेदवार देण्यास इच्छुक होतं. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली. त्यानंतर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. यावरून आता पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, “जनसामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेविरूद्ध तिकीट देता कामा नये, हा धडा घेणं गरजेचं आहे”, असा टोला नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

हेही वाचा : “शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?” राऊतांचा ‘त्या’ वक्तव्यावर संताप; म्हणाले, “वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये”

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

“मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जी घटना घडली. त्याबद्दल निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. काहीतरी घडल्याशिवाय निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला का? दाखल झालेला एफआयआर हा सर्वांना दिला पाहिजे. तुम्ही ती माहिती गुप्त का ठेवली? आता मोबाईलवर पासवर्ड येतो आणि त्यातून ईव्हीएम उघडता येते? ही नवीन गोष्ट कोठून आली? आधी कोस्टल बॅलेटची मोजणी करून ती जाहीर करायला हवी. पण ते झालेलं दिसत नाही. त्यामुळे हा आरोप ईव्हीएमवर नाही तर मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात झालेल्या प्रकाराबद्दल आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे या संदर्भातील मागणी करत आहोत. अर्थात आमची मागणी आहे की या सर्व प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांगली आणि साताऱ्यात काय घडलं?

“साताऱ्यामध्ये आमचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावं लागेल. तेथे आम्ही सगळे कमी पडलो. आता पराभवाची काय कारणं आहेत त्यांचे आम्ही विश्लेषण करत आहोत. मात्र, सांगलीतील परिस्थिती वेगळी आहे. त्या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे जनसामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध तिकीट देता कामा नये हा धडा घेणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी ज्या ताकदीने लोकसभेची निवडणूक लढली त्यापेक्षा अधिक ताकदीने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कमीत कमी १८० मतदारसंघात विजय मिळवणं आमचं लक्ष्य आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.