‘हर हाथ लूट, हर व्होट झूठ’ हे सिद्ध करणा-या काँग्रेसने जनतेला फसविण्याचाच उद्योग केला असून निवडणुकीचे घोषणापत्र नसून धोकापत्र असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथे झालेल्या प्रचारसभेत केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुराज्य येण्यासाठी काँग्रेस शासनाला मधुमेहासारखा जडलेला रोग मुळापासून उखडून काढण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी जमलेल्या जनसमुदायाला केले.
सांगली येथील भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील व हातकणंगलेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीत ३८ ते ३९ डिग्री सेल्सियस तापमान असतानाही २ लाखांहून अधिक लोक सभेस उपस्थित होते.
मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यासाठी विशिष्ट योजना आखली होती. मात्र गेली ६० वष्रे सत्तेवर असणा-या काँग्रेसने या धोरणाला हरताळ फासला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने नदी जोड प्रकल्प राबविण्याचा संकल्प केला होता. तीच आमची भूमिका असून यामुळे पूरग्रस्त असणा-या जनतेसोबतच दुष्काळग्रस्त जनतेलाही न्याय मिळेल.
काँग्रेसने घोषणा पत्रात दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाही. १० कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देणा-या काँग्रेस सरकारने वादा तोडला असून जनतेने आता त्यांच्याशी असणारे नाते तोडावे. मुके, बहिरे, लंगडे काँग्रेस सरकार आता जनतेला नको असून मजबुतीने देश विकासात अग्रेसर धोरणे राबविणा-या पक्षालाच जनतेने साथ द्यावी. घराणेशाही माथी मारण्याचे काँग्रेसचे धोरण लोकशाही व्यवस्थेचा शत्रू असून लोकांच्या स्वाभिमानाला यामुळे धोका पोहचतो.
महाराष्ट्र ही लढवय्यांची भूमी असून येथील मराठे सरदार तलवार हाती घेऊन लढले. मात्र सत्तेची लालूच लागलेले मराठे सरदार आता मोडक्या बॅटा घेऊन फिरत आहेत. लालबहाद्दूर शास्त्री यांची ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा काँग्रेसने ‘मर जवान मर किसान’ या पातळीवर नेली असून शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. शेतक-याच्या मालाला उत्पादित खर्चापेक्षा अधिक ५० टक्के नफा दिला तर गावे सदृढ होतील. गावे वाचली तरच शहरे वाचणार आहेत. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले.
देशातील जनता केवळ परिवर्तन मागत नसून शासनातील भ्रष्टाचार करणा-यांना शिक्षा करण्याच्या मूडमध्ये असल्याचे सांगत शासन व्यवस्थेचा भ्रष्टाचाराचा मधुमेह दूर केल्याशिवाय देशाचा सर्वागीण विकास साध्य होणार नाही, असे सांगत मोदी म्हणाले की, देशातील जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली असल्याने विजयाबद्दल शंका उरलेली नाही.
प्रारंभी, पाटील यांनी स्वागत करताना दुष्काळी भागासाठी पाणी योजनांना आíथक तरतूद करण्याची मागणी या वेळी केली. या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आ. सुरेश हळवणकर, आ. सुरेश खाडे,आ. प्रकाश शेंडगे, राज्य कार्यकारिणी सदस्य नीता केळकर, मकरंद देशपांडे आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेसचे घोषणापत्र धोकापत्र – मोदी
‘हर हाथ लूट, हर व्होट झूठ’ हे सिद्ध करणा-या काँग्रेसने जनतेला फसविण्याचाच उद्योग केला असून निवडणुकीचे घोषणापत्र नसून धोकापत्र असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथे झालेल्या प्रचारसभेत केली.
First published on: 10-04-2014 at 04:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress manifesto threat letter modi