करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य सरकारने गर्दी कमी करण्याकरिता निर्बंध कठोर केले आहेत. त्यानुसार राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येणार आहे. तसंच खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आलं आहे. हे निर्बंध रविवारी मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहेत. दरम्यान या निर्बंधांवरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली असून सरकार मनमानी कारभार करत असल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे सरकारच्या नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची टीका; म्हणाले, “हे सरकार गेंड्यापेक्षाही….”

रात्रीचे उद्योग करणाऱ्यांवर तुम्ही निर्बंध आणताय, आणायचेच असतील तर दिवसा चालणाऱ्या उद्योगांवरही आणा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. “आता जास्त निर्बंध आणून चालणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं, निर्बंध लावू नये,” असं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

दारुची दुकानंही बंद होणार?; राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…

“राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी, राज्यात केवळ पाच पक्ष आहेत, पण तसं होतं नाहीये. विरोधी पक्षांना विचारात घ्यायचं नसतं. राज्यात केवळ मनमानी कारभार चाललाय,” असं म्हणत पाटलांनी सरकारवर टीका केली. “किमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तरी बैठकीत बोलवायचं, ते शासकीयदृष्ट्या शासनाचा भाग आहेत,” असं पाटील म्हणाले.

राजेश टोपेंची प्रतिक्रिया –

जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राजेश टोपेंना चंद्रकांत पाटलांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्ही सगळ्यांनाच विश्वासात घेतो. जर देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या येत असेल तर काळजी करण्याचा विषय आहे. रुग्णालयातील बेड्सची व्याप्ती किंवा ऑक्सिजची मागणी वाढली आहे किंवा गंभीर रुग्ण आहेत असंही नाही. संसर्ग टाळण्यासाठी हे निर्बंध आहेत. जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात आणि राज्यात गर्दी कमी करणं हाच एकमेव रामबाण उपाय आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा उपाय लागू केला आहे”.

राज्यात कोणते निर्बंध लावले आहेत –

  • पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.
  • खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.
  • सरकारी कार्यालयांची दारे अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत.
  • लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
  • अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
  • मॉल्स, व्यापारी संकुले : ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.
  • उपाहारगृहांमध्ये ५० टक्केच प्रवेशाला परवानगी असेल. ग
  • शाळा व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय.
  • चित्रपट आणि नाटय़गृहे : ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी
  • जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.
  • केसकर्तनालये ५० टक्के क्षमतेने रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
  • जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
  • प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
  • रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतुकीवर कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नाहीत. जिल्हाबंदीही घालण्यात आलेली नाही. रेल्वे गाड्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवास करण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मास्क नसल्यास दंड ठोठावण्यात येईल. खासगी गाड्यांमधून प्रवास करताना मास्क आवश्यक असेल.
  • आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार. राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid omicron maharashtra health minister rajesh tope liquor shop temples religious places restrictions sgy 87
First published on: 09-01-2022 at 14:22 IST