दापोली : दापोली येथील सीमाशुल्क विभागाने शनिवारी १७ रोजी दापोली बस स्थानका मागे एका कारमधून कोट्यावधी रुपये किंमत असलेली सुमारे ४ किलो ८३३ ग्रॅम व्हेल माशाची अंबरग्रीस (उलटी) जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ४ जणांना अटक करुन रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत दापोली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेल माशाच्या अंबरग्रीस (उलटी)ची विक्री करण्यासाठी काही जण आले असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी संशयित गाडीचा पाठलाग करून ती दापोली बस स्थानकामागे थांबवली. या वाहनाची झडती घेतली असता त्यांना त्या वाहनात व्हेल माशाची अंबरग्रीस (उलटी) आढळून आली. या कार मध्ये ४ संशयित आढळून आले. त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले व चौकशीसाठी दापोली येथील सीमाशुल्क कार्यालयात आणण्यात आले व त्यांचेकडून माहिती घेण्यात आली.
याप्रकरणी संशयित युवराज मोरे (मुंबई), संजय धोपट(दाभोळ), नीलेश साळवी(रत्नागिरी), सिराज शेख (मुंबई) यांचेविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यापैकी संजय धोपट हे दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारीच असा गुन्हा करत असतील तर सामान्यांनी कोणाकडे पाहावे अशी चर्चा सुरु आहे.या कारवाईत सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोतदार, निरीक्षक प्रतीक अहलावत, रमणिक सिंग, मुख्य हवालदार सुहास विलणकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मौऱ्या, हेमंत वासनिक सहभागी झाले होते.संशयिताना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.