Dasara Melava 2025 : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या वेगवेगळ्या नेत्यांचे आणि पक्षांचे दसरा मेळावे राज्यात होणार आहेत. राज्याच्या राजकारणात दसरा मेळाव्यांना विशेष महत्त्व राहिले आहे. या दिवशी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्राचेही आयोजन केले जाते. तर मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे होतात. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या देखील भगवान गडावर त्यांचा दसरा मेळावा घेतात. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे देखील उद्या नारायणगड येथे मेळावा घेणार आहेत. त्यामुळे कुठे कोण काय वक्तव्य करणार? कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमका कोणाचा मेळावा कुठे होणार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा २०२५ हा उद्या (गुरूवार), २ ऑक्टोबर २०२५ रोजी दादर येथील शिवतीर्थ येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी ५ वाजता ठेवण्यात आली आहे. य़ावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी ६ वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही… अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ही बीड जिल्ह्यातील भगवान भक्ती गडावर होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ च्या सुमारास सुरूवात होण्याची शक्यता आहे तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा बीडमधील नारायणगडावर होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केले जाते. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होते.

शिवसेनेच्या मेळाव्याला मोठी परंपरा

शिवसेना दसरा मेळाव्याची मागील ५८ वर्षांची परंपरा आहे. २००६ साली दसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. त्यामुळे हा मेळावा त्या एकाच वर्षी रद्द करण्यात आला होता आणि २००९ साली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत राज्यासह देशावर करोनाचे संकट आल्याने दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या ठिकाणी घेण्यात आला होता. २०२२ साली शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांचा स्वतंत्र दसरा मेळावा आयोजित होऊ लागला.