मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शनिवारी, दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात चार मोठे राजकीय मेळावे होणार असून त्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत उडालेली आरोप-प्रत्यारोप आणि टीकेची राळ पाहता शनिवारच्या मेळाव्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मराठा नेते मनोज जरांगे कोणती शब्दास्त्रे वापरतात, याकडे लक्ष लागले आहे. शताब्दीत पदार्पण करत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा नागपूर येथे होणार असून त्यात सरसंघचालक काय संदेश देतात हेही लक्षवेधक ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील दोन-चार दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असताना शनिवारी होणारे मेळावे निवडणुकीच्या प्रचाराची दशा आणि दिशा दाखवतील, असा कयास आहे. शिवसेनेतील फुटीनंतरच्या तिसऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर भाषण करणार आहेत तर, मुंबईतील आझाद मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडेल. दोन्ही नेते एकमेकांवर काय टीका करतात याबरोबरच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने शक्तिप्रदर्शन कसे होते, याबाबत उत्कंठा आहे. हे संध्याकाळचे ‘सोने’ जनतेने लुटण्याआधी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘पॉडकास्ट’द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’च्या घोषणेद्वारे मैदानात उतरलेले राज ठाकरे कोणती नवी राजकीय भूमिका घेतात का, हेदेखील जाणणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मेळाव्यांचे दुसरे शक्तिकेंद्र मराठवाड्यात असून भाजप नेत्या पंकजा मुंडे बीडमधील सावरगाव घाट येथे मेळावा घेणार आहेत. त्यांच्या मेळाव्यात त्यांचे चुलत बंधू व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे हेदेखील सहभागी होणार आहेत. चौथा मेळावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे घेणार असून तोही महत्त्वाचा ठरणार आहे. बीडमधील नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे मराठा उमेदवार उतरवायचे की कुणाला पाठिंबा द्यायचा, याची घोषणा जरांगे करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीच्या विरोधात बऱ्यापैकी मतदान केले होते. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात राज्यात बसल्याने भाजपला केंद्रात स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. महाराष्ट्रातील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. यामुळेच जरांगे यांच्या मेळाव्याचे महत्त्व आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा विरूद्ध इतर मागासवर्गीय समाज असे ध्रुवीकरण बीड लोकसभा मतदारसंघात ठळकपणे दिसले. या दोन्ही मेळाव्यांच्या निमित्ताने ते पुन्हा अधोरेखीत होईल. हरियाणात भाजपने तेथे सुमारे २२ टक्के असलेल्या प्रभावी जाट समाजाला पर्याय म्हणून इतर मागासवर्गीय समाजाची यशस्वी मोट बांधली. त्याचा भाजपला मोठा फायदा झाला. अर्थात जाट समुदायाची जवळपास २२ ते २३ टक्के मतेही भाजपला मिळाली. असाच प्रयोग महाराष्ट्रात होण्याची चर्चा जोरात असून् त्याची सुरुवात शनिवारच्या मेळाव्यांतून होते का, याकडेही लक्ष लागले आहे.
सरसंघचालकांच्या भाषणाकडे लक्ष
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करणार आहे. या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहेत. संघ शताब्दी वर्षात पदार्पण करताना सरसंघचालक स्वयंसेवकांना काय संदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे. सकाळी ७.४० वाजता प्रमुख कार्यक्रम होणार असून त्यापूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे.