जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या आंदोलनाकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

‘एक्स’ सोशल मीडिया अकाउंटवर अजित पवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीनं लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे.”

हेही वाचा : VIDEO : “…अन्यथा पोलिसांना बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं”, जालना घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया

“जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“राज्यातील मराठा आंदोलनानं लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानंच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्याबरोबर आहे. असा विश्वास देतो.”

हेही वाचा : जालन्यात पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का केला? मुख्यमंत्री स्पष्टीकरण देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी,” असं आवाहन अजित पवारांनी मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना केलं आहे.