महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्याबाबत या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक नेते गौप्यस्फोट करत आहेत. तसेच निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा दिसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या घडामोडी संदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदान हे ठाकरे गटाकडे वळतंय का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी माणूस हा केवळ मराठी नाही तर हिंदू देखील आहे. उद्धव ठाकरे यांच्या ज्यावेळी लक्षात आलं की, मुंबईमध्ये आपल्याला मिळणारा मतदानाचा टक्का कमी झाला आहे. त्यामुळे आपल्याला याची भरपाई कोठून करता येईल असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मतांवर आपण जर लांगूनचालन केलं, त्यांच्यासमोर पायघड्या घातल्या तर आपल्याला हा मतदानाचा टक्का भरून काढता येईल. त्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक टिपू सुलतान जयंती साजरी केली. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी हे कधीच खपवून घेतलं नसतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते टिव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा : “…तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

“ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी प्रचार करताना दिसतो. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकले. खरं तर लाज वाटायला हवी की, आपण कुणाचे सुपुत्र आहोत. त्यानंतर साधा निषेधाचा एक शब्ददेखील ते बोलले नाहीत. स्पष्टीकरणही दिलं नाही. त्यावरून त्यांनी जे लांगूनचालन सुरू केलं असल्याचं दिसलं. आमचं असं मत आहे की, आम्ही निवडणुका जिंकणार आहोत. मात्र, एखाद्यावेळी जर अशी वेळ आली असती की एखादी निवडणूक हरावी लागेल. मात्र, पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरावं लागेल, लांगूनचालन कारावं लागेल किंवा पायघड्या घालाव्या लागतील, तर निवृत्ती घेतली असती”, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात हिंदू शब्द का सोडला?

“बाळासाहेब ठाकरे यांनी एवढ्या वर्ष त्यांच्या भाषणाची सुरूवात ही, माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो… अशी सुरुवात केली. मात्र, उद्धव ठाकरे जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून कालपर्यंत म्हणजे या लोकसभेची निवडणूक सुरू होण्याच्या आधीपर्यंत तु्म्ही म्हणायचे की, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…, पण काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची मुंबईत सभा झाली तेव्हापासून तुम्ही हिंदू शब्द भाषणात घेणं सोडलं. ते देशभक्त म्हणतात. मग हिंदू शब्द का सोडला. देशभक्त म्हणायला आमची हरकत नाही. मात्र, त्यांनी हिंदू शब्द का सोडला. कारण ज्यांच्या बरोबर ते गेले आहेत ते लोक नाराज होतील म्हणून त्यांनी हिंदू शब्द सोडला”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.