“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार येणार असून विकसित भारताचे स्वप्न पुढील पाच वर्षात पूर्ण होणार आहे. मागचा दहा वर्षांचा काळ हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. पुढची पाच वर्ष हे मागच्या दहा वर्षांपेक्षा भारी असणार आहेत. पुढची पाच वर्ष विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे असणार आहेत. पुढची पाच वर्ष भारताला आर्थिक महासत्ता बनविणारी असणार आहेत. ही पाच वर्ष गरीबी निर्मुलनाच्या अंतिम लढाईचे असणार आहेत, पुढच्या पाच वर्षात जगाला हेवा वाटावा, असा विकास होणार आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित आज मुंबईत भाजपाचे कार्यकर्ता संमेलन पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मबाबत भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात आपण तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहोत, हे सांगितलं. सरकार स्थापन करत असताना आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असंही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते छत्रपती झाले, तरीही एकही दिवस ते घरी बसले नाहीत. त्यांनी राज्य भोगले नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी बाहेर पडले. स्वर्गवासी होईपर्यंत छत्रपतींनी देशाची सेवा केली. त्याप्रमाणेच पंतप्रधान मोदींनीही भारताची सेवा करण्याचा संकल्प सोडला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विकसित भारत तयार करण्यासाठी आम्हाला तिसऱ्यांदा सत्ता हवी आहे. दहा वर्ष तुम्ही मोदींचे राज्य पाहिले. दहा वर्षात बदललेला भारत आणि जगात भारताची बदललेली प्रतिमा पाहिली. भारताचा आत्मसन्मान, स्वाभिमान, आत्माभिमान बदलताना आपण पाहिलं. एक मजबूत भारत आपण पाहिला. भारतामध्ये रस्ते, रेल्वे आणि विमानतळ झाले. भारतामधील गरीबाला कल्याणाच्या योजना मिळाल्या. घर, शौचालय, सिलिंडर मिळालं. भारताच्या तरुणाईला स्टार्टअपसाठी कर्ज मिळालं. अशा अनेक योजना मागच्या दहा वर्षात झाल्या. पुढील पाच वर्ष यापेक्षाही अधिक पटीने भारताची प्रगती होणार आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.