समृद्धी महामार्गावर शहापूर या ठिकाणी झालेल्या अपघातात बचावकार्य सुरु आहे. या अपघातातल्या मृतांची संख्या २० झाली आहे. आणखी तीन मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले त्यानंतर मृत कामगारांची संख्या १७ वरुन २० झाली आहे.

शहापूरच्या सरलांबे गावाजवळ घडली घटना

शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळ खुटाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. तब्बल १०० फूट उंच व सव्वा दोन किमी लांबीच्या पुलाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असताना गर्डर लाँचर करताना तांत्रिक कारणामुळे अचानक कोसळला व २० कामगारांचा यामध्ये मृत्यू झाला. हे सर्व कामगार उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू असे परप्रांतीय होते अशीही माहिती समोर आली आहे.

अपघाताच्या ठिकाणाहून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मध्यरात्री मंत्री दादा भुसे उपस्थित होते. तसेच एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, सामाजीक कार्यकर्त्या ज्योती पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमी रुग्णांची विचारपूस केली. तसेच शहापुरातील खासगी जीव रक्षक दल व सरलांबे येथील तरुण अपघातस्थळी मदत करत असल्याचे दिसून आले. एनडीआरएफचं पथक पण दुर्घटना स्थळी पाचारण करण्यात आलं. मात्र लोखंडी सांगड्यात अडकलेले मृतदेह काढण्यासाठी अडथळा निर्माण होत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही शासनातर्फे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे असंही जाहीर केलं.