सांगली : सांगली महापालिका क्षेत्राचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करावा आणि या माध्यमातून तिन्ही शहरांचा गतीने विकास करावा या जनुसराज्य शक्तीने केलेल्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास सचिवांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती जनसुराज्य शयतीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिली.
याबाबत श्री. कदम यांनी सांगितले, महापालिका स्थापन होउन २५ वर्षाचा कालावधी झाला असला तरी उत्पन्नाची साधने कमी असल्याने औद्योगिक विकास फारसा झालेला नसल्याने शहराचा विकास गतीने होऊ शकला नाही. शहरासह विस्तारित भागात नागरी सुविधा पुरविण्यावर महापालिकेच्या अल्प उत्पन्नामुळे अपेक्षित गती देता येत नाही. यामुळे सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरांचा विकास करण्यासाठी आणि नागरी सुविधा पुरविण्यासाठी स्मार्ट सिटीमध्ये समावेश करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्बारे केली.
आणखी वाचा-४२ एक्सप्रेस गाड्यांना महाराष्ट्रात विविध स्थानकांवर थांबे
जिल्ह्याचे केंद्र सांगली हे हळद नगरी म्हणून जगविख्यात आहे, तर मिरज वैद्यकीय सेवेसाठी दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमध्ये प्रसिध्द आहे. या शहरांचा संयुक्त विकास होणे गरजेचे असून शहरांचा उपनगराच्या माध्यमातून विस्तार झाला आहे. या सर्वच भागात रस्ते, पाणी, सांडपाणी निचरा प्रकल्प या मूलभूत समस्यासाठी निधीची गरज आहे. हा निधी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिळावा अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या मागणीची तातडीने दखल घेण्यात आली असून शहराच्या विकासासाठी आवश्यक बाबींचा तात्काळ आढावा घेउन तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाच्या सचिवांना देण्यात आल्या आहेत.