शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के शुल्कातील मिळणाऱ्या परताव्याच्या संदर्भाने आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारल्या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपत गिते असे लाच घेणाऱ्या वरिष्ठ सहायकाचे नाव आहे.

तक्रारदाराने शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्याच्या शुल्कातील परतावा मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला होता. यासाठी तक्रारदाराने गिते यांची भेट घेतली. आरटीई-२ हे प्रमाणपत्र देण्यासाठी गिते यांनी ५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गिते यांनी ४ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेताना संपत गिते यांना पकडण्यात आले.