महाविकासआघाडी सरकारमध्ये सुरू असलेले वाद पाहाता राज्यात कधीही निवडणुका लागू शकतील, असं भाकित भाजपा आमदार आशिष शेलार यांनी वर्तवल्यानंतर आता त्या गोष्टीचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच, महाविकासआघाडीचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं करता येईल, या आशिष शेलार यांच्या खोचक टीकेला देखील अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी कधीही त्या गोष्टीला महत्त्व देत नाही”

आशिष शेलार आज मावळ दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं होईल”. त्यांच्या या विधानावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे. “आज सरकार त्यांचं नाही ही त्यांची खंत आहे. त्यांचं दुखणं इतकं मोठं आहे की त्यावर दुसरं काहीही न करता अशीच गरळ ओकायची त्यांना सवय लागली आहे. मी कधीही त्या गोष्टीला महत्त्व देत नाही”, असं अजित पवार म्हणाले. माझा सिंहगड, माझं अभियान या मोहिमेचा शुभारंभ आज सिंहगडावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

“राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात”, आशिष शेलारांचं मोठं विधान!

“आपल्याला जी संधी जनतेनं दिली आहे, त्यातून प्रश्न सुटावेत आणि आपल्याला आपली मुदत संपल्यानंतर प्रश्न मार्गी लावल्याचं समाधान मिळावं अशी इच्छा आहे”, असं देखील अजित पवार म्हणाले.

जबड्यात हात आणि प्राण्यांची ओळख!

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेचं सरकार असताना झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची देखील आठवण करून दिली. महाविकासआघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद आणि भांडणं असल्याच्या आशिष शेलार यांच्या टीकेवर अजित पवार बोलत होते. “मागे भाजपा-शिवसेनेचं सरकार होतं. तेव्हा तुझ्या जबड्यात हात घालू, कोथळा काढू, वाघ-सिंह प्राण्यांची भरपूर आठवण काढली होती. तो निवडणुकांचा काळ होता. त्यानंतर त्यांनी सांगितलं की निवडणुकीत असं बोलायचं असतं आणि विसरून जायचं असतं. आताही ती पद्धत त्यांनी ठेवली आहे. आम्ही काही वाघ-सिंह करणार नाही. उद्धव ठाकरेही समंजस आहेत आणि आम्ही सगळे देखील एकमेकांना समजून घेऊ”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar mocks bjp mla ashish shelar sinhgad visit pmw svk
First published on: 01-10-2021 at 20:14 IST