scorecardresearch

“कुठं फेडाल ही पापं?” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल!”

अजित पवार म्हणतात, “शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन झालं. पण मला काही ते आवडलेलं नाही. नुतन शासकीय विश्रामगृह चेंबरी.. त्या चेंबरीचा पार चेचाच करून टाकला आहे!”

ajit pawar
अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि सडेतोड बोलण्याच्या पद्धतीसाठी परिचित आहेत. त्यांच्या अशा बोलण्यामुळे अनेकदा ते वादात देखील सापडले आहेत. मात्र, अशा प्रकारे त्यांनी समोरच्याला तिथल्या तिथे सुनावल्याचे अनेक प्रसंग देखील चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यावरून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली असताना नुकतंच साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामावरून त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. शिवाय, नंतर थेट स्टेजवरूनच या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.

उद्घाटनाच्या वेळीच बांधकामावरून सुनावलं!

अजित पवार यांच्याहस्ते साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी आत जाऊन पाहणी केली. तेव्हा सगळ्याच खोल्यांमध्ये बसवण्यात आलेले डबल बेड, भारंभार बसवण्यात आलेले लाईटचे स्पॉट अशा अनेक गोष्टींवरून त्यांनी आश्चर्यवजा नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही, तर अजित पवारांनी चक्क स्वच्छतागृहातील फ्लश व्यवस्थित चालतात की नाही, याची देखील स्वत: खातरजमा केली.

“चेंबरीचा पार चेचाच करून टाकला”

मात्र, यानंतर सभेत बोलताना स्टेजवरूनच त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. “शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन झालं. पण मला काही ते आवडलेलं नाही. नुतन शासकीय विश्रामगृह चेंबरी.. त्या चेंबरीचा पार चेचाच करून टाकला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“अधिकाऱ्यांना सांगायचंय, की बाबांनो…”

यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचक शब्दांत इशारा दिला आहे. “मी आता त्या बांधकामाची चौकशी लावणार आहे. मला अधिकाऱ्यांना सांगायचंय की बाबांनो, तुम्हाला आम्ही दीड लाख कोटी रुपये पगार आणि निवृत्ती वेतन देतो. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्सचा तो पैसा असतो. ते करताना कामं तरी चांगली करत चला”, असं अजित पवार म्हणाले.

“अधिकाऱ्यांना वाटत असेल, हा सारखा दमच देत असतो”

“कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल. लोकांनी पण म्हटलं पाहिजे की खरंच त्या सरकारच्या काळात हे काम एक नंबर झालं. नाहीतर आम्ही मुंबईला आमच्या घरी पोहोचेपर्यंत इथे काहीतरी तुटलेलं असायचं. काय त्याला करायचंय? मग त्याबद्दल कारवाई नको का करायला? काही काही अधिकाऱ्यांना वाटत असतं की हा सारखाच दम देत असतो. चांगलं काम केल्यानंतर तुमचं कौतुकही करेन ना”, अशा शब्दांत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deputy cm ajit pawar slams officers in satara bad construction work rest house pmw