राज्यामधील राजकारणात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये वाद सुरु असल्याची जोरदार चर्चा आहे. आधी शिवसेनेच्या २५ आमदारांचे निधीवाटपावरून नाराजीचे पत्र, नंतर खासदार गजानन कीर्तीकर व नुकतीच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीमध्ये वरचष्मा असल्याची टीका केल्याने महिनाभरात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमधील खदखद सातत्याने प्रकट झाली.

नक्की वाचा >> “ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते; शरद पवार पण रडत होते, कधी सुप्रिया सुळे…”

तशात विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाने हा शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या निकटवर्तीयांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य करत असताना भाजपाच्या नेत्यांविरोधातील तक्रारींवर आक्रमकपणे कारवाई होत नाही, राष्ट्रवादीकडे सहकार व गृह विभाग असूनही कारवाईचा वेग संथ राहतो असे अधिवेशनात बोलले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीत भाजपला आक्रमक प्रत्युत्तर देण्यावरून एकजूट नसल्याचे चित्र दिसून आले. याचसंदर्भात आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी पाच शब्दात उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> ‘कश्मीर फाइल’ रिलीजच होऊ द्यायला नको होता म्हणणाऱ्या पवारांना फडणवीसांनी हसून दिलं उत्तर; म्हणाले, “राष्ट्रवादी…”

देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आहेत. सकाळी अकराच्या सुमारास ते नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळेस फडणवीस यांनी पत्रकारांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी नागपूरमधील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी टाकलेला छापा, शरद पवार यांनी शालेय शिक्षणामधून द्वेष पसरवला जात असल्याची केलेली टीका, पवारांनी ‘द कश्मीर फाइल्स’संदर्भात केलेलं वक्तव्य अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.

नक्की वाचा >> महाविकास आघाडीतील ‘या’ दोन मंत्र्यांविरोधातील तक्रार मोदी सरकारने स्वीकारली; सोमय्या म्हणाले, “आजपासून…”

फडणवीस यांनी उके यांच्यावर नागपूर पोलिसांच्या तक्रारीवरुन कारवाई झाल्याचं सांगितलं तर पुढे ‘कश्मीर फाइल्स’संदर्भात बोलताना त्यांनी, “राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी चढाओढ सुरु असून त्यातून अशी वक्तव्य केली जात आहेत,” असं म्हटलं.

फडणवीस यांनी थेट सत्ताधारी पक्षांचं नाव घेऊन टीका केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना “महाविकास आघाडीचे ९० टक्के आमदार नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं का?,” असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “यावर मी काही बोलणार नाही,” असं म्हटलं आणि ते निघून गेले.

नक्की वाचा >> फडणवीसांविरोधात याचिकेमुळे चर्चेत आलेल्या उके वकिलांविरोधीतील ED च्या कारवाईवर फडणवीस म्हणतात, “२००५ पासून…”

फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज एकाच विमानाने नागपूरमध्ये दाखल झाले. या प्रवासामध्ये दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आलीय.