देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एसटी संपात सहभागी न झाल्याचं कारण; म्हणाले,…

भाजपाने संपात विलीनीकरणाचा मुद्दा आणून सरकारला वेठीस धरल्याचा आरोप फडणवीसांनी फेटाळला.

devendra fadanvis
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी दीर्घकाळ चाललेल्या एसटी कामगारांच्या संपाला भाजपा नेत्यांनी पाठिंबा दर्शवला होता. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर तसंच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत तर तब्बल १६ दिवस आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात बसून होते. देवेंद्र फडणवीस मात्र एकदाही आझाद मैदानावर आंदोलनात गेले नाहीत, याबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात होते. त्यावर आता खुद्द फडणवीसांनीच पडदा टाकला आहे.

याबद्दल टीव्ही ९ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, “आमचे दोन आमदार तिथे होते. एसटीचे लोक मला स्वत: येऊन भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा प्रश्न मी सातत्याने मांडला. त्यामुळे तिथे गेलेच पाहिजे असं काही नाही. मी त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून सरकारशीही सातत्याने बोलत होतो”.

फडणवीस पुढे म्हणाले, आमच्या आमदारांनी समंजसपणाची भूमिका दाखवली. संप मोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आमच्या आमदारांनी संघर्ष केला. १६ दिवस आमचे आमदार आझाद मैदानात झोपले होते. कामगारांसोबत होते. त्यानंतर सरकार दोन पावलं पुढे आलं. तेव्हा आमच्या आमदारांनी सामंजस्याची भूमिका घेतली. सरकार पगार वाढ करत आहे. पण विलीनीकरणाचा प्रश्न सोडायचा नाही. मात्र दीर्घकाळ एसटीही बंद ठेवता येत नाही. कर्मचारी महत्त्वाचे आहेत. तसेच लोकही महत्त्वाचे आहेत. लोकांची गैरसोय होत आहे, याचा आमच्या लोकांनी विचार केला. पगारवाढीनंतर आमच्या लोकांनी माघार घेतली. पण विलीनीकरणाला आमचा पाठिंबा आहे, हेही माघार घेताना सांगितलं. आम्ही सामंजस्याने भूमिका घेतल्यानंतर सत्तारुढ पक्ष त्यावर टीका करतो. आम्ही प्रगल्भता दाखवूनही सत्ता पक्ष अप्रगल्भ वागला नाही”.

भाजपाने संपात विलीनीकरणाचा मुद्दा आणून सरकारला वेठीस धरल्याचा आरोप फडणवीसांनी फेटाळला. ते म्हणाले, “संप सुरू झाल्यानंतर ८ दिवसानंतर भाजपा नेते संपात आले. या संपकाळात आम्ही प्रगल्भपणे वागलो. पण या सरकारला प्रगल्भ विरोधी पक्षही नकोय. त्यामुळे कधी कधी वाटतं विरोधाला विरोध केलेला बरा. आम्ही विलिनीकरणावर मार्गही सांगितला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्या म्हणून सांगितलं होतं”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis on st protest why he was not there vsk

ताज्या बातम्या