राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा केलाय. मात्र आता या द्यावावरुन भाजपाच्या नेत्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. अशी ऑफर आपण मुश्रीफ यांना दिलीच नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुश्रीफ यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदीच खोचक शब्दात मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय.

राज्यामध्ये मागील दोन दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या विरुद्ध ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ असा संघर्ष सुरु असून कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी याच प्रकरणावरुन सोमय्या यांना आजचा कोल्हापूर दौरा रद्द करावा लागलाय. आता या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच फडणवीस यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. मुश्रीफ यांनी मला ऑफर दिलेली मी नाकारली तर मला टार्गेट केलं जात आहे असा आरोप केल्याचं पत्रकारांनी फडणवीस यांना सांगत यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी खोचक शब्दात मुश्रीफ यांच्या दाव्याववर भाष्य केलं.

मुश्रीफ काय म्हणाले?

“किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत. मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांचा वापर त्यांनी फक्त टूल म्हणून केलेला आहे. चंद्रकांत पाटलांना सातत्याने चिंता वाटते की आपण प्रदेशाध्यक्ष आहोत त्या जिल्ह्यामध्ये भाजपा भुईसपाट झालेला आहे. हा कोणी भुईसपाट केला तर हसन मुश्रीफ याला कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीत येण्याची सुद्धा विनंती केली होती. मात्र पवार एके पवार म्हणत मी ती विनंती मान्य केली नाही,” असा दावा मुश्रीफ यांनी केलाय.

फडणवीसांचा टोला…

याचसंदर्भात फडणवीस यांना पत्रकारांनी छेडले असता फडणवीस यांनी मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. “कोणी ऑफर दिली मुश्रीफ साहेबांना?” असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केलाय. “अशा ऑफर घेऊन आम्ही फिरत थोडी असतो. आमचे ऑफर लेटर असे मैदानात पडलेली नाहीयत कोणालाही देण्याकरता,” असंही फडणवीस म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांना लगावला टोला

मुख्यमंत्र्यांना सोमय्यांविरोधातील या संपूर्ण कारवाईची काहीच कल्पना नव्हती असं शिवसेनेच्या सुत्रांनी म्हटलंय. याचवरुन फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होत, असं मत फडणवीस यांनी नोंदवलं आहे. “आता ते दोन पक्षच याबद्दल सांगू शकतात,” असं फडणवीस म्हणाले. तसेच “असं असू शकतं की गृहमंत्र्यांना माहिती नसेल आणि थेट गृहमंत्र्यांनी ती कारवाई केली असेल. पण मग माझं मत असंही ही चुकीची कारवाई चाललीय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये दखल देऊन अशी कारवाई थांबली पाहिजे होती,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच या प्रकरणासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी भाजपाची भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरु राहील असं म्हटलं आहे. “मला असं वाटतं की देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की एखादा व्यक्ती म्हणतो की मी भ्रष्टाचाऱ्याच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करायला जातोय असं म्हणतो आणि पोलीस त्याला अडवतात. कारण सांगितलं जातं की ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतामध्ये या प्रकारची कायदा सुव्यवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. एकूणच जे काही सुरु आहे ते भयानक आहे. पण भारतीय जनता पार्टी थांबणार नाही. सातत्याने भाजपाची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरुच राहील,” असं फडणवीस म्हणाले.