Devendra Fadnavis on BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement : भाजपाचे परतूरचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावर राज्यभरातून टीका होऊ लागली आहे. मतदारसंघातील एका गावात केलेल्या भाषणात लोणीकरांनी त्यांच्या टीकाकारांवर हल्लाबोल केला. “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत त्या आम्हीच दिल्या आहेत”, असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं होतं. यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक विरोधी पक्षांनी लोणीकरांवर टीका करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
दरम्यान, जनतेचा संताप व विरोधकांची टीका पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकरांना समज देऊ असं वक्तव्य केलं आहे. लोणीकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाचे प्रधानसेवक म्हणतात. आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे कोणालाही जनतेचे मालक बनता येणार नाही”.
देवेंद्र फडणवीसांकडून बबनराव लोणीकरांना समज
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बबनराव लोणीकरांचं वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरी ते काही लोकांना उद्देशून केलेलं असं वक्तव्य असलं तरी अशा प्रकारचं बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा सांगतात की मी या देशाचा प्रधानसेवक आहे. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. तर, आम्हाला जनतेचे मालक होता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकर यांचं जे वक्तव्य वृत्तवाहिन्यांवर दाखवलं जात आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे बननराव लोणीकरांना समज दिली जाईल.
बबनराव लोणीकर नेमकं काय म्हणाले होते?
बबनराव लोणीकर म्हणाले होते की “ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार या बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये मोदींनी दिले. तुझ्या मायच्या, बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडेही आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायात बूट व चप्पल आमच्यामुळेच आहे. तुझ्या हातातलं डबडं, म्हणजे तो मोबाईल देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?”