सावंतवाडी : देवगड तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. वाढलेली झाडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि केबल टाकण्यासाठी खोदलेले चर यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेला बसत आहे, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला वाढलेली झाडी, झुडपे आणि झाडांच्या फांद्या अनेक ठिकाणी बसच्या काचांवर आदळतात, ज्यामुळे त्या फुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच, अरुंद रस्त्यांमुळे आणि वाढलेल्या झाडीमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी केबल टाकण्यासाठी खोदलेले चर योग्यरित्या बुजवले नसल्याने बसगाड्या त्यात रूतून (अडकून) एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे खड्ड्यांची संख्या आणखी वाढली असून, त्यामुळे लहान-मोठे अपघातही होत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांची मागणी
स्थानिक नागरिक आणि एसटी चालक-वाहक यांनी वारंवार तक्रारी करूनही स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे, स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेल्या एसटी फेऱ्या बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी येत असतात. त्यांच्या प्रवासाला सुखकर बनवण्यासाठी लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा असलेली वाढलेली झाडी आणि फांद्या तातडीने काढण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
केबलसाठी खोदलेले चर योग्यप्रकारे बुजवून रस्ते सुस्थितीत आणावेत. खड्ड्यांची तातडीने डागडुजी करावी. या समस्यांवर तात्काळ लक्ष न दिल्यास ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेली “लालपरी” सेवा ठप्प होण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनाने आणि संबंधित विभागांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. यामुळे केवळ प्रवाशांनाच नाही, तर इतर लहान-मोठ्या वाहनांनाही सुरक्षित प्रवास करता येईल.