गेले दोन आठवडे सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या निवडीची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली. ज्येष्ठ भाजप नेते व काका गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालविण्याची माझी इच्छा नाही, पण त्यांचा संघर्षांचा वारसा मी चालविणार असल्याचे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी सभागृहात निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदावरून वाद होते. दोघांनीही दावा केल्याने निवडीची घोषणा गेले दोन आठवडे होऊ शकली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेत २८ आमदार असून काँग्रेसचे २० आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचा दावा होता. पण विधानसभेत काँग्रेसचे ४२ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ असतानाही त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केला होता. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावे, असा काँग्रेसचा दबाव होता. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा झाली असली तरी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पटकावणार की राष्ट्रवादी काँग्रेस, हे अजून गुलदस्त्यात आहे. हे पद संख्याबळाच्या आधारे काँग्रेसकडे जावे, असे भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनाही वाटत आहे. पण राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य संबंधितांच्या होणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय मंगळवारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसला अजूनही काही दिवस झुलविण्याची खेळी केली जाण्याचीही शक्यता आहे.

काँग्रेसचा दबाव नाही
विरोधी पक्षनेतेपदाच्या निर्णयाबाबत काँग्रेस पक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपल्यावर कधीही दबाव आणला नसल्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.

काका गोपीनाथ मुंडे यांनीच माझी राजकीय जडणघडण केली. प्रमोद महाजन यांच्याबरोबरही मी काम केले. गृहकलहानंतर मी पक्ष सोडला. त्यावर अनेक आक्षेप घेतले गेले व टीकाही झाली. मी निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून नेहमीच एकनिष्ठ असतो.
-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांमध्येच लढत होते. विरोधी पक्षनेता असल्याशिवाय मजा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाखाली सारे काही सुरू आहे, असे चित्र होते. लढवय्या विरोधी पक्षनेता असला पाहिजे.
-दिवाकर रावते ,परिवहन मंत्री