सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २६ ते ३० जूनअखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात गुरुवारी (दि. २६) पाडेगाव, लोणंद (ता. खंडाळा) येथे प्रवेश करणार आहे. त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करून ३० जून रोजी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे.पालखी सोहळा हा निरा-लोणंद-फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार आहे.

पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असतात. पालखी मार्गावर कोणताही अपघात, वाहतूक समस्या, अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पालखी सोहळ्यातील वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक) वाहने खेरीज करून इतर सर्व वाहनांना निरा-लोणंद-पंढरपूर मार्गावर २५ ते ३० जून या कालावधीत प्रवेश करण्यास अधिसूचनेने मनाई आदेश जारी केला आहे. २५ ते २९ जूनपर्यंत फलटण येथून पुणे, निरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथून पूणेकडे शिरगाव (ता. वाई) घाटातून वळविण्यात येत आहे. दि. २५ ते २८ जूनपर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करण्यात येत आहे. दि. २५ ते ३० जूनपर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्कीमार्गे फलटणकडे वळविण्यात येणार आहे.

दि. २५ ते दि. २९ जूनपर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. दि. २८ ते ३० जूनपर्यंत फलटण ते नातेपुते वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. दि. २८ जून रोजी नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज येथून बारामतीमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. दि. २८ जूनपासून नातेपुतेकडून फलटणमार्गे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणेमार्गे दहीवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते-दहीगाव-जांब-बारामतीमार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दि. २९ जून रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड मुक्कामी सकाळी मार्गस्थ होणार आहे. या वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रस्त्याने बरडकडे जाण्याऐवजी फलटण दहीवडी चोक-कोळकी शिंगणापूर तिकाटणे-बडले-पिंप्रद बरड अशी वळविण्यात येत आहेत.पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये-जा करतील, याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत.