FSSAI Rules for Hotels Resorts: देशभरात कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. केवळ पावसाळ्यातच नाही तर इतर ऋतूंमध्येही फिरण्याला प्राधान्य असतेच. शिवाय बाहेर जेवायला जाणं हे तर दर महिन्याला ठरलेलंच आहे. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात रिसॉर्ट्स, फार्म हाऊस किंवा हॉटेल्स ही तुंडूंब भरलेली असतात. यंदा मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला, त्यामुळे पर्यटकांची दर विकेंडला कुठे ना कुठे गर्दी दिसत आहे. अशात फिरायला जाताना लोकांचा कल केवळ मजा, मस्ती करण्याकडे असतो. मात्र, आपण जिथे जाऊन काय खातो, तिथे अन्न ताजं की शिळं की एक्सपायरी झालेलं खातो, संबंधित ठिकाणची स्वच्छता किती आहे याचा विचार किती जणं करत असतील? बरं, हे काही केवळ पर्यटनस्थळांबाबतच नाही तर, इतर वेळीसुद्धा जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा तिथे स्वच्छतेबाबतचे किंवा अन्नपदार्थांविषयीचे नियम कितपत पाळले जातात हे कधी जाणून घेतले आहे का? भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने हॉटेल्स, रिसॉर्ट्स, स्टॉल्स, खानावळ यांच्यासाठी नियमावली दिलेली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित हॉटेलवर दंडात्मक कारवाई होते तसंच काहीवेळा त्यांना सुधारणा नोटीसही पाठवली जाते. मात्र, सुधारणा नोटीसीनंतरही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले तर त्या संस्थेचा परवाना रद्द होऊ शकतो.

लोणावळ्यात काही महिन्यांपूर्वी १० रिसॉर्ट्सवर एफडीएने छापा टाकत कारवाई केली होती. नेमक्या पावासाळ्यात ही कारवाई झाल्याने पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेल्समधील अन्नसुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अलिकडेच अनेक ठिकाणी छापे टाकत बनावट पनीर, भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केलेला आहे. बहुतेक ठिकाणी मुदतबाह्य म्हणजेच एक्सापायर झालेले पदार्थ वापरून तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याचे समोर आले. अनेकदा एक्सपायरी डेटबाबत छेडछाड करत अन्नपदार्थ विकले जातात आणि मग त्यातून विषबाधा किंवा इतर गंभीर आजार उद्भवू शकतात.

पर्यटनासाठी जाणाऱ्या तसंच बाहेर जेवण्याचा पर्याय निवडल्यास प्रत्येक नागरिकाने काही गोष्टींबाबत खबरदारी घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. आजच्या धावपळीच्या युगात, घरच्या जेवणाइतकंच बाहेरचं जेवणही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालं आहे. हॉटेल, खानावळ, रेस्टॉरंट, स्टॉल्स रोज हजारो लोक अशा अन्नसंस्थांमधून जेवण घेत असतात. अन्नाची चव, किंमत आणि सेवा जशी महत्त्वाची आहे, तशीच एक गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते ती म्हणजे अन्ननिर्मितीची स्वच्छता आणि सुरक्षितता.

आपण जो अन्नाचा घास घेतो तो केवळ आपल्या जिभेवर परिणाम करत नाही, तर आपल्या शरीराच्या आरोग्यावरही खोलवर प्रभाव करतो. त्यामुळे कोणत्याही अन्नसंस्थेत कुठल्या गोष्टी स्वच्छ असाव्यात याची माहिती असणे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. याचसाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) ने अन्नव्यवसायासाठी काही नियम व निकष आखून दिले आहेत, जे FSSAI नियमावली २०११ (Schedule 4 – Part V) अंतर्गत दिलेले आहेत.

बाहेरचे अन्न खाताना सावधानता बाळगा

१. या नियमानुसार एखादी खाद्यसंस्था केवळ स्वादिष्ट नाही, तर आरोग्यदायीदेखील असावी लागते. या प्रक्रियेत सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो तो भोजनगृहाची स्वच्छता, अन्न हाताळणाऱ्यांची सवय, स्वयंपाकघरातील साधनसामग्रीची स्थिती आणि पाण्याचा दर्जा. या सगळ्या गोष्टींबाबतचे नियम जर काटेकोरपणे पाळले जात असतील, तर त्या संस्थेमधून मिळणारे अन्न खाताना आपण अधिक विश्वासाने घास घेऊ शकतो.
उदाहरणार्थ- रेस्टॉरंटच्या भिंती, जमिनी व छत जर व्यवस्थित धुऊन स्वच्छ ठेवले गेले असतील, तेथे कीटकांचा वावर नसेल, अन्न वेगवेगळ्या कंटेनरमध्ये योग्य तापमानावर साठवले जात असेल, तर अशा संस्थेतील अन्न आपले पोट आणि तब्येतीसाठी फायदेशीर ठरते.

२. या अन्न प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी भांडी आणि उपकरणे धुण्यायोग्य, अन्नसुरक्षेसाठी सुसंगत असायला हवीत. तसेच भाज्या आणि मांसाचे चॉपिंग बोर्ड वेगवेगळे असले पाहिजेत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास ही छोटीशी गोष्टदेखील मोठ्या आजारांना कारणीभूत ठरू शकते.३. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेचे नियम पाळले गेले पाहिजेत. स्वच्छ गणवेश, डोक्याला टोपी, हातमोजे आणि योग्य प्रशिक्षण या गोष्टी त्यांच्या कामाचा भाग असायला हव्यात. तेथील कर्मचारी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त (फिटनेस) असल्याबाबतच्या हमीचे प्रमाणपत्र असणे आणि त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हात धुण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.

४. आपण जिथे खातो तिथले पाणी जर स्वच्छ आणि पिण्यायोग्य नसेल, तर कुठल्याही चवदार जेवणाचे महत्व उरत नाही. म्हणूनच दर काही महिन्यांनी पाण्याची गुणवत्ता तपासणे आणि बर्फ पिण्याच्या पाण्यातूनच तयार केला गेलाय या गोष्टींची खात्रीही अन्नसंस्थांनी करून घेतलेली असणे गरजेचे आहे.

५. कचरा व्यवस्थापन हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. सडलेला, उघड्यावर ठेवलेला किंवा योग्य पद्धतीने न टाकलेला कचरा माश्यांना आकर्षित करतो आणि त्यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण होतो. ते लक्षात घेता, कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत (ओला/सुका) करून, नियमितपणे त्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे.

६. सर्वसामान्य ग्राहक म्हणून आपण ज्या हॉटेलमध्ये जेवायला जातो, तिथे FSSAI चा परवाना (License) दिसतो का, Food Safety Display Board लावलेला आहे का याबाबत खात्री करून घेणे हा आपला हक्क आहे. हे फलक म्हणजे त्या अन्नसंस्थेने अन्नसुरक्षा नियमांचे पालन केले आहे याची हमी असते.

७. आपण फक्त अन्नाचा स्वाद घेतो; पण त्या स्वादामागे शिस्तबद्ध स्वच्छता, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मेहनत आणि नियमबद्ध कार्यपद्धती असते. जर आपण ग्राहक म्हणून या गोष्टींकडे सजगतेने पाहिले, तर अन्नसंस्थांवरदेखील दर्जा राखण्याचा सकारात्मक दबाव येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील नियमावली अन्न व सुरक्षा प्राधिकरणाच्या (बृहन्मुंबई १)च्या सहाय्यक आयुक्त (अन्न)अनुपमा बाळासाहेब पाटील यांनी दिलेली आहे.