नगर : ‘‘काही जण स्वत:चे काहीही कर्तृत्व नसताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत. समाजात तेढ निर्माण करत आहेत, महाराष्ट्रातील वातावरण दूषित करणाऱ्यांना स्वत:ला तरी हनुमान चालिसा म्हणता येते का? परंतु त्यांनीही आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये,’’ असाही स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून दिला.

खासदार सुप्रिया सुळे आज, मंगळवारी नगरमध्ये होत्या. यांच्या उपस्थितीत सायंकाळी पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा आढावा मेळावा घेण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्यी. पक्षाचे आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, पांडुरंग अभंग, राहुल जगताप, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर आदी उपस्थित होते. या वेळी सुळे यांनी सांगितले, की ‘राष्ट्रवादी’ खणखणीत नाणे असल्यामुळेच आपल्यावर टीका होते, परंतु महाराष्ट्र हा दगड उचलणाऱ्यांच्या संस्कृतीचा नाही, छत्रपतींचे नाव घेण्याचाही त्यांना अधिकार नाही. त्यांनी दगड हाती घेतला तरी आपण विचारांनी त्याचा लढा देऊ.

राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा भोंगे, चालिसापेक्षा महागाईचा विषय ज्वलंत

भोंगे व चालिसा यापेक्षा महागाई, रोजगार हा ज्वलंत विषय आहे, प्रत्येक घरातील संवेदनशील विषय झाला आहे. केंद्र सरकारने महागाईवर तोडगा काढावा, यासाठी आपण पंतप्रधान मोदी यांनाही भेटू, असेही सुळे यांनी पत्रकारांना सांगितले. दिल्लीतील दंगलीची जबाबदारी केंद्र सरकारच्या गृह विभागाने स्वीकारावी, कारण दिल्लीमध्ये केंद्र सरकारचे पोलीस कार्यरत आहेत. राज्यात, देशात दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे काही जणांना निवडणुकीचे वेध लागले असावेत, ही शक्यता नाकारता येणार नाही असेही असाही दावा त्यांनी केला. 

‘नगरमध्ये ‘पर्यटन ट्रॅक’ विकसित करा’

पुणे जिल्ह्यात बारामती-इंदापूर-दौंड-पुरंदर असा ‘पर्यटन ट्रॅक’ विकसित केला जात आहे. त्याच पद्धतीने नगरमध्ये ‘पर्यटन ट्रॅक’ विकसित करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घ्यावा. जेथे देशाचा इतिहास घडला, असा भुईकोट किल्ला विकसित करा, शिर्डीला जाणारा भाविक किल्ल्याला भेट देईल अशी व्यवस्था करा, अशी सूचनाही खासदार सुळे यांनी केली.