लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : नाटक आणि कलावंताना उर्जितावस्था येण्यासाठी लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही मिळायला हवा. त्यामुळेच नाट्यसृष्टी जिवंत राहू शकेल, असे मत अ. भा. मराठी नाट्य विभागीय संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

शंभरावे अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर पार पडले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनाचे हस्तांतरण मराठी नाट्य परिषदेच्या बीड शाखेकडे करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सिनेनाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, सिने नाट्य कलाकार किशोर महाबोले, नीलम शिर्के-सामंत, दीपक करंजीकर, ‘मराठी बाणा’चे अशोक हांडे, अतुल परचुरे आदींची उपस्थिती होती.

आणखी वाचा-मराठा आरक्षणाविषयी ओबीसी नेत्यांची विधाने राजकीयदृष्ट्या बोलण्यासाठीच असतात – चंद्रकांत पाटील

नव्या पिढीत कलावंत घडवायचे असतील तर विद्यापीठात कला विभागाला शासनाकडून भरघोस निधीची तरतूद झालीपाहिजे. मुंबई व पुण्यात होणारी चांगली नाटके सोलापूरसह महाराष्ट्रातील इतर शहरापर्यत आली तरच नाट्य चळवळ जिवंत राहू शकणार आहे.

शासनाकडून नाट्य परिषदेसाठी नऊ कोटी ३३ लाखांचा निधी मिळाला असून त्यातून अनेक स्पर्धा भरविल्या जाणार आहेत, अशी माहिती सतीश लोटके यांनी दिली. मराठी नाट्य विभागीय संमेलने अजून पाच महिने सुरू राहणार असून बीड, लातूर, मुंबई असे संमेलन आयोजन करून शेवटी रत्नागिरीमध्ये या शंभराव्या नाट्य संमेलनाचा समारोप होणार आहे, असेही लोटके यांनी सांगितले.

आणखी वाचा-कवठेमहांकाळमध्ये दुकानांना आग, लाखोची हानी

प्रारंभी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या १५० विद्यार्थी कलावंतांनी सामूहिक तबलावादन करून गीत सादर केले. विभागीय नाट्य संमेलन समितीचे प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी दिलेल्या सहयोगाबद्दल स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रभावित झाले. त्यांनी आपल्या हातातील घड्याळ काढून साळुंखे यांच्या हातात बांधून त्यांचा गौरव केला. यावेळी सोलापूरच्या नाट्य परंपरा आणि कलावंतांची माहिती देणा-या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.

या दोन दिवसांच्या नाट्य संमेलनात सिनेनाट्य आभिनेत्री सविता मालपेकर, आसावरी जोशी, संजीवनी जाधव तेजश्री प्रधान, अपूर्वा नेमळेकर यांच्या प्रकट मुलाखती घेण्यात आल्या. संगीत रजनी कार्यक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला. अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचा आनंद लुटण्यात आला. प्रशांत दामले आणि वर्षा ऊसगावकर यांच्या ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाट्य प्रयोगाने रसिकांची दाद मिळविली.