महाराष्ट्रासह देशभरात ईडी या तपासयंत्रणेचा गैरवापर केला जातो आहे. केंद्र सरकार ईडीचा वापर विरोधकांना निरस्त करण्यासाठी करते आहे. ईडी ही यंत्रणा भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे असा गंभीर आरोप शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर केला आहे. सध्या आम्ही निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल त्याची वाट पाहतो आहोत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय शरद पवारांनी?

“या देशातील एजन्सींचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या घडीला ईडी, सीबीआय इतर एजन्सींचा वापर ठिकठिकाणी गैरवापर केला जातो आहे. कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ माणसाच्या संदर्भात कारवाई झाली. अटक करण्यात आली. डी. के. शिवकुमार यांना न्यायालयाने निर्दोष सोडलं. एखाद्या राज्यातला इतका वरिष्ठ नेता त्याला अटक करणं, कोर्टाने त्याला सोडणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर केला जातो. “

महाराष्ट्रात ईडीचा गैरवापर

“महाराष्ट्रात या सगळ्याचा वापर सुरु झाल्याचं दिसतं आहे. अनिल देशमुख यांनी एका संस्थेला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप अनिल देशमुखांवर झाला होता. त्यासाठी त्यांना अटकही झाली. आता असं दिसतं आहे की चार्जशीटमध्ये ती रक्कम १ कोटी आहे. तसंच ती देणगी आहे. तरीही देशमुख यांना त्यात अडकवण्यात आलं. आता न्यायालयाचा निर्णय काय लागेल ते पाहणं आवश्यक आहे. एक प्रकारची दहशत निर्माण केली जाते आहे. रोहित पवार यांना दोन ते तीन दिवसांत चौकशीसाठी बोलवलं गेलं आणि त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई सुरु करणं हे दिसतं आहे. त्यांच्यावरचा आरोप असा आहे की ते साखर कारखाना विकत घेतानाचं त्यांचं टेंडर मोठं होतं. आता बँकेने विकलेल्या कारखान्यांची यादी पाहिली तर ते २५ कोटींच्या आत साखर कारखाने विकले गेले तिथे कारवाई नाही. ५४ कोटीला कारखाना गेल्यावर चौकशी सुरु झाली. दहशत निर्माण करणं, सक्रिय कार्यकर्त्याला थांबवणं हे यामागे दिसतं आहे.” असं शरद पवार म्हणाले.

हे पण वाचा- सत्तेतील काही नेत्यांच्या गैरव्यवहाराच्या फाईल्स माझ्याकडे; रोहित पवार यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडी म्हणजे भाजपाचा सहकारी पक्ष

आम्ही सगळी माहिती मिळवली त्यावेळी समोर आलं की ईडीने २००५ ते २०२३ या सतरा वर्षांच्या काळात दोन सरकारं होती. एक आमचं सरकार म्हणजे यूपीए सरकार होतं आणि आत्ताचं सरकार आहे. ५९०६ केसेस नोंदवल्या गेल्या. यापैकी चौकशी करुन निर्णय लागला त्या फक्त २५ केसेस आहेत. असाही आरोप शरद पवार यांनी केला. त्याचप्रमाणे ईडी ही संस्था भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे. भाजपाचे नेते आधीच सांगतात की अमुक नेत्यावर कारवाई होणार आहे आणि तशी ती कारवाई घडते. ईडीचे अधिकारी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडतात की भाजपाच्या कार्यालयातून हेच कळत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.