कर्जत : कृषी उत्पन्न बाजार समिती, कर्जत यांच्या वतीने राशीन येथील जुन्या बैल बाजार परिसरातील व्यापारी गाळ्यांचा लिलाव तब्बल आठ कोटी रुपयांना यशस्वीपणे पार पडला. हा लिलाव बाजार समितीच्या उपबाजार समितीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी गाळ्यांच्या अनुषंगाने घेण्यात आला. बाजार समितीच्या कर्जत येथील कार्यालयात पार पडलेल्या या लिलावास सभापती काकासाहेब तापकीर व उपसभापती अभय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी संचालक बळीराम अण्णा यादव, नंदकुमार नवले, पप्पू शेठ नेवसे, वसंत कांबळे, मंगेश जगताप, रामदास मांडगे, तसेच बाजार समितीचे सचिव सतीश कदम आणि व्यापारी अक्षय राऊत प्रमुख उपस्थित होते.
या लिलावप्रक्रियेचे संचालन अधिकारी तनपुरे यांनी पार पाडले. लिलावात कर्जत, राशीनसह विविध परिसरातील अडते व्यापारी, इतर व्यापारी व शेतकरी सहभागी झाले होते. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीने अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबवला असून, या यशस्वी लिलावाची सर्वत्र स्तुती व कौतुक होत आहे. व्यापारी गाळ्यांची कामे सध्या प्रगतिपथावर असून, लवकरच व्यापाऱ्यांना नवी सुविधा उपलब्ध होणार आहे.
राशीन जुना बैल बाजार या परिसरातील ५८ व्यापारी गाळ्यांचा लिलाव बाजार समितीने उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांच्या पुढाकारातून केला. यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात आणखी व्यापारी गाळे निर्माण करून एक चांगली बाजारपेठ त्या ठिकाणी निर्माण करण्यात येईल. त्याचा शेतकरी, नागरिक व व्यापारी या सर्वांनाच फायदा होणार आहे.-काकासाहेब तापकीर, सभापती