Sanjay Raut and Uddhav Thackeray Interview Highlights: ‘महाराष्ट्र विधानसभेत भाजपाला पाशवी बहुमत मिळालं. जल्लोष कुठे होता? लोक अवाक झाले होते. आम्ही ठरवून तुम्हाला मतं दिलं असं लोक सांगतात. तरी एवढी कमी मतं मिळाली. आरटीआयमध्ये तुमची सगळी माहिती मिळते मग माझी माहितीही मिळायला हवी ना. बॅलेट पेपरवर माझं मत कुठे जातंय हे शेवटपर्यंत कळत होतं. बॅलेट पेपरवर आपण सगळ्यांनी मतदान केलं आहे. ईव्हीएमध्ये पावती मिळते पण माझं मत कुठे रजिस्टर होतं कळत नाही. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हायला हव्यात’, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं. सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी ईव्हीएमसंदर्भात भूमिका मांडली. ‘दिवा पेटतोय, रिसीट दिसतेय पण आत जे मत मोजलं जातं ती रिसीट मोजली जात नाही. काही प्रतीकात्मक रिसीट मोजल्या जातात. व्हीव्हीपॅटवरचं मोजलं जात नाही. माझं मत कुठे नोंदल गेलंय ते कळण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे’, असं त्यांनी सांगितलं.

‘मतदान मतपत्रिकेवरच व्हायला हवं. ईव्हीएम का आणलंत- वेळ जातो म्हणून. मग एकेक महिना निवडणूक प्रक्रिया चालते ते का ग्राह्य धरलं नाही. माझ्याकडे आज मतदान होतंय, अन्य कुठे आठ दिवसांनी होतंय- मधला वेळ गेलाच ना. फरक काय पडतोय. अमेरिकेतही बॅलेट पेपर आहे. युकेतही बॅलेट पेपर आहे. ते काय मागास देश आहेत. वेळ वाचवण्यासाठी हे करत असाल. ईव्हीएमविरोधात नरेंद्र मोदींचं भाषण आहे’, असं उद्धव म्हणाले.

लोकसभेला जे कमावलं ते विधानसभेत गमावलं

‘काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारायला हव्यात. ईव्हीएम घोटाळ्यावर चर्चा सुरू आहे. मतदार याद्यांबद्दल चर्चा आहे. बोगस मतदारांबद्दल चर्चा आहे. मतदार कसे वाढले हे समोर आलं आहे. ही एक गोष्ट नाही. काही योजना त्यांनी जाहीर केल्या, ज्यात फसगत झाली आहे. निवडणूक जेवढी मोठी असते तेवढे वाद कमी असतात. निवडणूक छोटी म्हणजे मतदारसंघाच्या आकारमानाने म्हणतोय. तसं तर कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते. मतदारसंघ छोटा होत जातो, तसं स्पर्धा वाढत जाते’, असं उद्धव यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, ‘लोकसभेवेळी महाविकास आघाडीत अनेक पक्ष आल्यावर खेचाखेच होते. शिवसेना-भाजपामध्येही होत होती. महाविकास आघाडी म्हणून पहिल्यांदा लोकसभा लढलो. शिवसेनेने चार ते पाचवेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले. विधानसभेला हा मतदारसंघ तुला, हा मला हे शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच राहिलं. तू तू मैं मैं सुरू राहिलं. दुष्परिणाम असा झाला की जनतेत असं झालं की यांच्यात आताच खेचाखेच सुरू असेल तर नंतर काय होणार’.

‘आपल्यातून मी पणा आला तिथे पराभव झाला’

विधानसभेतील पराभवाची मीमांसा उद्धव यांनी केली. त्यांनी सांगितलं की, ‘लोकसभेच्या वेळेला फेब्रुवारीत प्रचार सुरू केला. उमेदवार होते पण निशाणी नव्हती. विधानसभेच्या वेळेला निशाणी होती पण जागा कोणत्या आणि उमेदवारी कोणाला देणार निश्चित नव्हतं. ही तू तू मैं मैं झाली ती स्वीकारली पाहिजे. ती चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. लोकसभेचं यश नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं. लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी नेते ते कार्यकर्ते- आपल्याला जिंकायचंय या भावनेने लढला. विधानसभेला मला जिंकायचंय ही भावना आली. आपल्यातून मी पणा आला तेव्हा पराभव आला’.
‘तांत्रिक बाबी होत्या.योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजना. योग्यवेळी करू म्हणतात. मी एकमेव मुख्यमंत्री होतो ज्याने कुणीही न मागता २ लाखापर्यंतचं पीककर्ज मुक्त केलं. नागपूरमध्ये अधिवेशन झालं. सात मंत्री होतो. त्याच्यानंतर जो नियमित कर्जफेड करतो त्याला ५०,००० कर्जफेड राशी कोरोनामुळे देऊ शकलो नाही. सुरुवात केली आणि सरकार पाडलं’, असं उद्धव म्हणाले.

‘प्रतिकूल काळात सरकार चालवून दाखवलं’

‘लोकांपर्यंत काम पोहोचवण्यात अपयश आलं. लोकसभेत देशाचा विचार करून संविधान बदलणार हा मुद्दा होताच. निवडणूक त्यावर फोकस झाली. विधानसभेला फोकस व्हायला हवी होती. तसं झालं नाही. प्रतिकूल काळात सरकार चालवून दाखवलं. कोरोना संकट काळात गुजरात, गंगेतल्या प्रेतांचे फोटो आले होते. कोरोनात राज्यात गंभीर परिस्थिती उदभवू दिली नाही’, असं उद्धव यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे कट्टर राजकीय विरोधक होते. आम्ही एकत्र आलो ते सरकार स्थापन करायला. आधी आघाडी होते, निवडणूक होते, बहुमत मिळालं तर सरकार होतं. आम्ही उलटा प्रवास केला. आम्ही एकत्र येऊन अत्यंत प्रतिकूल काळात सरकार चालवलं. ना केंद्र सरकारचा पाठिंबा होता, ना अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावर होतं. शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था सांभाळली. आम्ही लोकांना सांगूच शकलो नाही. ती एक विचित्र चढाओढ झाली. आपण केलेली चांगली कामं सांगू शकलो नाही. पैशाचा पाऊसमध्ये लोक वाहवत गेले. आजही लोक मान्य करतात. आपल्याकडून उणीव राहिली. आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही. शिवभोजन सुरू केलं. शेतकऱ्यांना हमीभाव दिली. एनआरसीवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखली. कोरोना काळात बटेंगे तो कटेंगे नाही केलं. मी सर्वांना समान न्याय दिला. लोकांनी मला कुटुंबातला एक मानला. ज्यांना मी कधी भेटलो नाही त्यांनी आपलं मानलं. यासारखं दुसरं समाधान ते कोणतं…

‘रेड्याचा नाहक जीव गेला’

‘एवढ्या जागा मिळतील हे भाजपालादेखील वाटलं नव्हतं. शिंदे सेनेला ५० जागा- त्यांनी कदाचित डायनासोरच कापला असेल. कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटतं. या जादूटोण्यावर माझा विश्वास नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांचा आहे. त्यांची मानसिकता कळते. दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्यांच्या कृत्यातून कळतं. रेडा कापला असेल त्यांनी तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला. त्याच्यामुळे काही घडतंय असा माझा अजिबात विश्वास नाही. पण त्यांच्या कृतीतून मनातलं काळंबेरं दिसलं. माझा या भाकडकथेवर विश्वास नाही’, असं उद्धव यांनी ठामपणे सांगितलं.

बिहारमध्ये एनआरसी

‘बिहारमध्ये मतदारांनी ओळख पटवून द्यायची. म्हणजे एनआरसीच आहे की. आधार कार्ड हा घोटाळा आहे. आधार कार्ड ग्राह्य धरणार नसाल तर मग तो घोटाळा आहे. आयडेंडिटी म्हणजे आणखी काय वेगळं. एनआरसी म्हणजे वेगळं काय? वन नेशन वन इलेक्शन आम्हाला बहकाव्यात आलो. काश्मीरात ३७० कलम काढायला हवं यावर आम्ही ठाम होतो. आजही आहोत. म्हणूनच पाठिंबा दिला. एक निशाण, एक विधान, एक प्रधान असं झालं आहे. वन लँग्वेजही करतील. नड्डा बोलले की देशात एकच पक्ष राहील. वन पार्टी, नो इलेक्शन होईल’, असं ते म्हणाले. आम्ही घडवण्याचं काम केलं, बिघडवण्याचं कोणी केलं माहिती नाही. निवडून आलेले फोडून राज्य स्थापन करा ना. निवडणुकीचा घाट कशाला घालता. प्रचाराला जाऊच नका असं उद्धव म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राजकारण नव्हे गजकर्ण’

‘राजकारण्यांचा उबग येतो. हे राजकारण नाही. हे गजकर्ण आहे. सत्तेची खाज आहे. जेवढं खाजवाल तेवढं जास्त. केंद्रात सत्ता मिळाली, राज्यात मिळाली तरी सोसायटीतही माझाच माणूस हवा हा हट्ट आहे. दूध महासंघही माझाच हवा. सत्तेचं गजकर्ण आहे, राजकारण नाही’, अशी टीका उद्धव यांनी केली.