राहाता : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व साईबाबांविषयी समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमांवर पसरविली जात असलेली चुकीची, दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती ही गंभीर व दु:खद बाब आहे. या विरोधात संस्थानकडून कायदेशीर पावले उचलण्यात येत असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडिलकर यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
गाडिलकर यांनी सांगितले, की अलीकडेच सामाजिक माध्यमांतून साईबाबा संस्थानाने हज यात्रेसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, असा भ्रामक व खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. असा कोणत्याही प्रकारचा निधी संस्थानाने वितरित केलेला नाही. हा दावा पूर्णपणे खोटा, निराधार व श्रद्धाळू भावनांशी खेळ करणारा आहे. त्याचप्रमाणे अजय गौतम व गौतम खट्टर या व्यक्तींनी साईबाबांविषयी त्यांच्या यू ट्युब चॅनलवर प्रसारित केलेली आक्षेपार्ह व अपमानास्पद विधाने निषेधार्ह असून, संस्थानाने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावून, येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. त्यावर न्यायालयाने अंतरिम आदेश देत संबंधित व्यक्तींना श्री साईबाबांविषयी कोणतीही बदनामीकारक किंवा अपमानकारक विधाने करण्यास मनाई केली आहे.
साईबाबा संस्थानचा कारभार महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमानुसार पारदर्शक व नियमबद्ध रीतीने केला जातो. संस्थानमध्ये येणाऱ्या देणग्यांचा उपयोग सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी केला जातो. देणगी फक्त अधिकृत दानपेट्या व अधिकृत काउंटरवरच स्वीकारली जाते. इतर कोणतीही आर्थिक देवाणघेवाण केली जात नाही. संस्थानाच्या तदर्थ समितीस ५० लाखांपर्यंतच्या खर्चाचे स्वातंत्र्य आहे. त्यापुढील सर्व खर्चासाठी उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. साईबाबांवरील प्रेम, श्रद्धा व भक्ती जपणाऱ्या लाखो भक्तांच्या भावना आणि संस्थानची प्रतिष्ठा राखण्यासाठी, भविष्यातही अशा प्रकारे अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही गाडिलकर यांनी स्पष्ट केले.