कराड : उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल देण्याची सुबुद्धी साखर कारखानदारांना द्यावी असे साकडे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर शेतकरी संघटनांच्यावतीने नतमस्तक होऊन घालण्यात आले.कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन उसदरासाठी निघालेली टाळ-मृदुंगाच्या गजरातील पायी दिंडी कराडच्या प्रीतिसंगमावर विसावली. येथील माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर उस आणि फुले वाहून शेतकरी व सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी व शेतकऱ्यांनी ‘उसाला साडेतीन हजाराच्या पहिल्या देयकासाठी सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना सुबुद्धी द्या’ असे साकडे घातले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उसदर संघर्ष समितीच्या पुढाकाराने निघालेल्या या सहा किलोमीटरच्या पायी दिंडीत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, बैलगाडा शर्यत संघटनेचे नेते धनाजी शिंदे, प्रहार संघटनेचे अमोल कारंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘उसदर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी प्रीतिसंगम उद्यान परिसर दणाणून गेले होते.

हेही वाचा: ‘महाविकास आघाडीतील मंत्र्यांची चौकशी करणार’ म्हणणाऱ्या नरेश म्हस्केंना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर; म्हणाले, “नगरविकास विभागाच्या…”

सदाभाऊ खोत या वेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याचे पहिले मुख्यमंत्री व उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात सहकार आणि साखर कारखानदारी उभी केली. आज मात्र चव्हाणसाहेबांचे नाव घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांना त्यांच्या मूळ विचाराचा विसर पडलाय. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने उसाला जो दर देत आहेत. तेवढाच साखर उतारा असताना साताऱ्यातील कारखानदार कोल्हापूरप्रमाणे उसदर का देत नाही हा आमचा प्रश्न आहे.

हेही वाचा: राज्य सरकार दपडशाही करत असल्याच्या सुप्रिया सुळेंच्या आरोपाला बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आव्हाडांवर जे गुन्हे…”

राज्यकर्त्यांनी दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट काढून टाकावी आणि खुली स्पर्धा निर्माण करावी. सर्व उद्योग खुले असतील, त्यावर असे बंधने नसतीलतर ती साखर कारखान्यांबाबतीत का असा सवाल करून, आमच्या बापाच्या शेतात जे पिकतंय त्यावर तुम्ही बंधन लावताय आणि त्यातील संबंधित साखर कारखानदाराला मोकळे रान करून देताय हे अतिशय चुकीचे असल्याची खंत सदाभाऊंनी व्यक्त केली. शरद जोशी यांनी झोनबंदीची लढाई सन १९८४ ला सुरु केली आणि १९९६ ला ही बंदी अखेर उठली. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहू. पण, आमच्या मागण्या मान्य केल्याखेरीज स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा खोत यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer organizations protest about sugar prices shreds placed at yashwantrao chavhan karad tmb 01
First published on: 14-11-2022 at 19:15 IST