कोल्हापूर : चंदगड तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग नेण्याचा आमदार शिवाजी पाटील यांचा प्रयत्न तालुक्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. या महामार्गाच्या विरोधात लढा तीव्र करण्यात येईल, असा निर्धार चंदगड तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एका बैठकीवेळी केला. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर परिसरातून विरोध होत असल्याने तो गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातून नेला जावा, अशी भूमिका घेऊन चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर काढला होता. त्यांच्या या भूमिकेस गडहिंग्लज पाठोपाठ आता चंदगड येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तालुक्यातून विरोध होत आहे.
हलकर्णी येथे झालेल्या बैठकीत अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतजमीन, निसर्ग उद्ध्वस्त करणारा असल्याने या प्रश्नात राजकारण न करता सर्वांनी एकजुटीने या विरोधात लढा दिला पाहिजे, असे आवाहन केले. तर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंग कुपेकर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात राजकीय हेतूने नाही तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असल्याने त्या विरोधात संघर्ष अटळ असल्याचे सांगितले.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक संपत देसाई यांनी राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाच्या विरोधात असताना आमदार शिवाजी पाटील त्यासाठी आग्रह धरतात, हे दुर्दैवी असल्याची टीका केली. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, गोपाळराव पाटील, संतोष मळविकर, रियाज शमनजी, विद्याधर गुरवे आदींनी भूमिका मांडली.