जळगाव : जिल्ह्यात सद्य:स्थितीत तापमानाचा पारा वाढला असून, सकाळी आठपासूनच चटके जाणवत आहेत. एप्रिलमध्येच मे महिन्यातील स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका केळीसह इतर पिकांना बसत असून शेतीकामेही रखडली आहेत. या एकंदर परिस्थितीत केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ग्रामीण भागात दुपारी शेतीकामे बंद ठेवण्यात येत आहेत.

उष्णतेचा कहर एप्रिल अखेपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला होता. जिल्ह्यासह रावेर, यावल या तालुक्यांत तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. याचा परिणाम केळी पिकांवर होऊ लागला आहे. यामुळे केळीचे घड सटकणे, केळी बागेच्या पूर्व-पश्चिमेकडील केळी पीक करपण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून बागेच्या संरक्षणासाठी दोन्ही बाजूंना जाळी, सनची झाडे लावण्यात येत आहेत. काही शेतकरी नवीन प्रयोग करून रोपे वाचविण्याची कसरत करीत आहेत.

उन्हाळय़ात मार्चअखेर ते एप्रिलच्या दुसऱ्या – तिसऱ्या आठवडय़ापर्यंत पारा ३५ ते ४० अंशांपर्यंत असे. यंदा मात्र मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासूनच तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. एप्रिलच्या पंधरवडय़ात तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचला असून, त्याचा केळीसह इतर पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. वाढत्या तापमानाने केळी पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतीसाठी पूर्ण वीजपुरवठा करावा 

यावर्षी मार्च अखेरपासूनच तापमानाचा पारा चढता राहिला. यामुळे या काळात केळी पिकाला वेळेवर पाणी देणे आवश्यक आहे. यंदा या दोन्ही तालुक्यांत भूजल पातळी चांगली आहे. मात्र, राज्यभरात विजेची मागणी आणि पुरवठा यात मोठय़ा प्रमाणात तफावत असून, विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. वीजपुरवठय़ात कमतरता आली असून केळीला मोठा फटका बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीतर्फे पुरवठा सुरळीत व पूर्णवेळ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टिश्युकल्चर रोपांची लागवड 

मार्च अखेरपासून शेतकऱ्यांनी टिश्युकल्चर (आघात) केळीची रोपे लावली आहेत. त्याचबरोबर एप्रिलअखेर आणि मे महिन्यातील उष्णतेचा परिणाम होऊ नये म्हणून या रोपांबरोबर सन वनस्पतीही लावण्यात आली असून, उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी कागद आणि केळीच्या रोपांभोवती संरक्षण म्हणून काडय़ांचे साहाय्य देण्यात आले आहे.

केळी पिकाला खर्च खूप लागतो. काही दिवसांपूर्वीच पेरणी करण्यात आलेल्या पिकांना वाचविण्यासाठी पेपर आणि काडय़ांपासून छोटय़ा-छोटय़ा झोपडय़ा बनवून प्रयत्न सुरू केला आहे. उन्हापासून संरक्षण करून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. प्रशांत शिदे (शेतकरी)