scorecardresearch

याचिका मागे घेण्यासाठी १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी, संस्था चालक, बीडमध्ये मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हा दाखल

बीडमध्ये सेवानिवृत्तीनंतरही पैसे उकळण्याचा मोह शिक्षण संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही.

bribe
प्रतिकात्मक छायाचित्र

बीडमध्ये सेवानिवृत्तीनंतरही पैसे उकळण्याचा मोह शिक्षण संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही. थकीत वेतन काढण्यासाठी आणि न्यायालयात दाखल याचिका मागे घेण्यासाठी १२ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचा प्रकार केज येथे उघडकीस आला. पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्वीकारतांना एक जण जाळ्यात अडकल्याने सचिवासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

केज येथील शिक्षण संस्थेतील लाचखोरीचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदाराचे थकीत वेतन व सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या विरुद्ध संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, तांबवा (ता. केज) या संस्थेचे सचिव अशोक हरिभाऊ चाटे, गणेश माध्यमिक विद्यालय, मुख्याध्यापक अनंत बाबुराव हांगे, सानेगुरुजी विद्यालय (तांबवा), अध्यक्ष उद्धव माणिकराव कराड व खासगी व्यक्ती दत्तात्रय सुर्यभान धस यांनी तक्रारदाराकडे १२ लाख रुपये लाचेची मागणी केली.

हेही वाचा : बीडमध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू; आईची मृत्यूशी झुंज सुरू

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने सापळा लावला असता आरोपींनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. तसेच पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्विकारताना पंचासमक्ष भगवान मेडिकल स्टोअर येथे रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक शंकर शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fir against headmaster for taking bribe in education institute in beed pbs

ताज्या बातम्या