मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र अजूनही सुरूच आहे. माणगावजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कार आणि टँकर यांच्यात समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला.
मुंबईतील गोरेगाव इथे राहणारे साळवी कुटुंब महाडकडून मुंबईकडे जात होते, तर टँकर महाडच्या दिशेने जात होता. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या डायव्हर्शनचा अंदाज न आल्याने स्विफ्ट कार समोरून येणाऱ्या टँकरवर जाऊन धडकली. यात कारमधील शुभांगी मनोहर साळवी, सुचिता मनोहर साळवी, संगीता मनोहर साळवी, दीप्ती मनोहर साळवी आणि गाडीचा चालक सुनील गडकर यांचा मृत्यू झाला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे पळस्पे ते इंदापूरदरम्यान काम सुरू आहे. या चौपदरीकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी डायव्हर्शन टाकण्यात आली आहे. मात्र याबाबत चालकांना सूचना देणारे ठळक फलक लावले जात नसून कंत्राटदाराच्या याच निष्काळजीपणाचा फटका प्रवाशांच्या जिवावर बेतत असल्याचा आरोप केला जातो आहे. गेल्या महिन्याभरात महामार्गावर झालेल्या विविध अपघातात ४५ हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते अपघातांमध्ये वाढ होत आहे. या मार्गावरील वळणे धोकादायक असल्यामुळे वाहने हळू चालवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.