पंढरपूर : वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम येथील भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीवर दिसून आला आहे. उजनी धरणातून ७१ हजार तर वीर धरणातून ३२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येथील वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पालिकेने दिला आहे.
नुकतेच आषाढी यात्रेपूर्वी पुणे जिल्ह्यातील दमदार पावसाने उजनी धरण ८५ टक्के भरले होते. ऐन आषाढी वारीत पूर येऊ नये म्हणून उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला होता. त्याच बरोबरीने वीर धरणातून नीरा नदीला पाणी सोडले होते. हे पाणी पुढे भीमा नदीला मिळते. त्यामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पर्यायाने पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती ओढावली आहे.
पुणे जिल्ह्यात दमदार पावसाने धरणे पूर्ण क्षमतेने भरू लागली आहेत. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी उजनी धरणात मिसळते. याचा परिणाम उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रविवारी उजनी धरणातून पाणी सोडले होते. यात वाढ होऊन सोमवारी सायंकाळी ६ वाजता ७१ हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे. तर वीर धरणातून ३२ हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वीर धरणातून नीर नदीला सोडण्यात आलेले पाणी अकलूजजवळील भीमा नदीच्या संगम येथे मिसळतो. पुढे हे पाणी पंढरपूरला येते. त्यामुळे दोन्ही ठिकाणाहून आलेल्या पाण्याने येथील वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तर शहरातील नदीकाठी झोपडपट्टी आणि इतर नागरिकांना पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर शहरातील काही भागांत पुराचे पाणी येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याच्या तर भाविकांनी नदी पात्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.